निलंगेकरांच्या अनुपस्थितीने सुरेश धसांच्या तंबूमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:00 PM2018-05-04T14:00:53+5:302018-05-04T14:00:53+5:30
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघांतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपा-शिवसेना महायुतीकडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला
- सतीश जोशी
बीड : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघांतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपा-शिवसेना महायुतीकडून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती उपस्थितांना चांगलीच खटकली. विशेषत: या मतदारसंघाची सारी जबाबदारी भाजपाने मुंडे आणि निलंगेकरावर सोपवली होती.
या मतदार संघात पक्षीय बलाबल बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३६, काँग्रेसचे १९१ असे एकूण ५२७ तर भाजपा ३०२, शिवसेना ६५ असे एकूण ३६७ मतदार आहेत. एमआयम २० आणि इतर ९२ अशी एकूण मतदारांची संख्या १००६ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यामुळे राष्ट्रवादीचे रमेश कराड यांची बाजू अधिक भक्कम झाली. रमेश कराड यांनी भाजपातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत तर सुरेश धसांनी राष्ट्रवादीतून भाजपात जात ही उमेदवारी मिळवली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता आणि लातूरचे दिलीपराव देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. निवडणूक लढविण्यास दिलीपराव इच्छुक नसल्यामुळे त्यांचे खंदे समर्थक अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु आघाडी झाल्यामुळे त्यांच्या महत्वाकांक्षेवरही पाणी फेरले असले तरी त्यांची ही नाराजी रमेश कराड यांना दूर करावी लागणार आहे.
गुरुवारी सुरेश धस यांनी उस्मानाबादेत उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, खा. सुनील गायकवाड, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकूर, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, आ.सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, माजी आ. गोविंदराव केंद्रे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, रमेश पोकळे, नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, सहाल चाऊस, हारुण इनामदार, दत्ता कुलकर्णी, प्रवीण घुगे, संतोष हंगे, गयाताई कराड आणि बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मी नाराज नाही
संभाजी पाटील निलंगेकर यांची अनुपस्थिती सुरेश धसांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी होती. या मतदारसंघातून संभाजी पाटील हे आपल्या बंधूस उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते, परंतु ती न मिळाल्यामुळे त्यांनी अशी ही नाराजी व्यक्त केली, अशी चर्चाही ऐकावयास मिळाली. यासंदर्भात निलंगेकरांनी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल केली असून त्यात आपण नाराज नसून राज्याचा प्रतिनिधी म्हणून एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राजस्थानला गेलो होतो, असे म्हटले आहे.