अंबाजोगाई : सोशल डिस्टन्सिंगमुळे कार्यालयात येण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एकाने महिला तलाठ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील सातबाराचे रजिस्टर फाडून टाकले. ही घटना अंबाजोगाई शहरात मंगळवारी दुपारी घडली.
माया प्रभू चव्हाण या साकुड सजाच्या तलाठी आहेत. मंगळवारी अंबाजोगाईच आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून अनेक लोक येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी लागणारे कागदपत्रे, फेरफार नकला, सात बारा, ८-अ इ. देण्यासाठी त्या अंबाजोगाईतील प्रशांत नगर कार्यालयात थांबल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचा दरवाजा पुढे करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्यांचे कामकाज सुरु होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास मांडवा पठाण येथील बाबासाहेब बळीराम जोगदंड हा शेतकरी त्यांच्या कार्यालयात आला. मला तुम्ही कार्यालयात का येऊ देत नाहीत असे म्हणत त्याने जबरदस्तीने आत प्रवेश केला.
मांडवा पठाण गावचा गट दाखवा म्हणत चव्हाण यांच्या हातातील गट रजिस्टर हिसकावून घेत त्याचे दोन तुकडे केले. चव्हाण यांच्याशी अर्वाच्च भाषा वापरत ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी माया चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब बळीराम जोगदंडवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक संदीप दहिफळे करत आहेत.