UPSC Results : कोटा पद्धतीने मिळाली नाही पोस्टिंग; निराश न होता जिद्दीने दिव्यांग जयंतने पुन्हा मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:53 PM2020-08-04T22:53:20+5:302020-08-04T22:55:44+5:30
दोन वर्षांपूर्वी याच परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असतानाही कोटा संपला म्हणून त्याच्यावर अन्याय झाला
माजलगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालात बीड येथील जयंत किशोर मंकले याने पुन्हा बाजी मारली असून दिव्यांगातून देशातून १४३ वी रँक मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असतानाही कोटा संपला म्हणून त्याच्यावर अन्याय झाला , हा संघर्ष सुरू असताना त्याने पुन्हा परीक्षा देऊन आपली जुनी ९२३ रँक मागे टाकून १४३ वी रँक मिळवून यश संपादन केले.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सिद्धेश्वर विध्यालयात व बीड येथिल चंपावती विध्यालयात त्याने शालेय शिक्षण घेतले, पुढे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.दुर्दैवाने त्यास अचानक डोळ्यांचा आजार होऊन त्यात अंधत्व आले.तरीही त्यानंतर त्याने शिक्षणाचा ध्यास घेतला अंधत्वावर मात करत पुणे येथील युनिक अकॅडमी यांच्या मदतीने अहोरात्र अभ्यास करून २०१८ साली यूपीएससी परीक्षा दिली त्यात तो देशातून ९२३ वी रँक मिळवून उत्तीर्ण झाला.मात्र नशीब त्याच्या बाजूने नव्हते. दिव्यांगाचा कोटा संपला म्हणून त्यास दोन वर्षे लोटली तरी नियुक्ती न दिल्याने जयंतने मुंबई खंडपीठात धाव घेतली, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.असे असताना जयंतने गतवर्षी पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्या परीक्षेत १४३ वी रँक मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.त्याच्या या संघर्षमय यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.