तारू गव्हाण बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचे गोदापात्रात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 07:49 PM2019-06-03T19:49:55+5:302019-06-03T19:51:42+5:30
गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
माजलगाव (बीड ) : तारू गव्हाण येथील गोदावरी नदी वरील बंधाऱ्याचे काम मागील तेरा वर्षापासून प्रलंबित असून अत्यंत धीम्या गतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधाऱ्यावरील अवलंबून असणाऱ्या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी गोदापात्रात लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
माजलगाव ,परळी, पाथरी तालुक्यातील पंचेवीस गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयाच्या बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. या बंधाऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाथरी सह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. त्या दृष्टीने या बंधाऱ्याची बांधणी करण्याचे आयोजन होते. परंतु जवळपास १३ वर्षापासून ा बंधार्याची बांधणी सुरू करण्यात आली. परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास पंचवीस गावातील शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत.
यामुळे गावकऱ्यांनी बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गोदावरी पात्रातच आज दुपारी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांनी बंधा-याचे गेट १५ जुलैपर्यंत बसविण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात ग्रामस्थ आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख ,अनंतराव डक, बाळासाहेब डाके,अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे,अमित नाटकर आदींची उपस्थिती होती.