गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 01:12 PM2021-08-16T13:12:52+5:302021-08-16T13:15:59+5:30
यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे.
बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपा पक्ष राज्यातील वाड्या-तांड्यावर नेला. त्यांच्यामुळेच आम्ही आज येथे आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagvat karad ) यांनी परळी येथे केले. डॉ. कराड यांनी आज सकाळी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde ) , खा. प्रीतम मुंडे ( Pritam Munde ) यांच्यासह सपत्नीक वैद्यनाथाच्या पायरीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ( We are here because of the work done by Gopinath Munde - Dr. Bhagwat Karad)
यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा ( BJP's Jansanwad Yatra ) काढण्याचे नियोजन केले आहे. भाजपाची मराठवाड्यातील जनसंवाद यात्रा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात गोपीनाथ गडावरून सुरु झाली. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. यातूनच त्यांचे समर्थकदेखील नाराज झाल्याचे बोलले गेले. त्यामुळे डॉ. कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आज सकाळी मुंडे भगिनी यांनी केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांचे स्वागत केले. यानंतर डॉ. कराड यांनी वैद्यनाथ मंदिराच्या पायरीची सपत्नीक दर्शन घेतले. यानंतर गोपीनाथ गडावरून जनसंवाद यात्रा सुरु झाली.
असा आहे जनआशीर्वाद यात्रेचा मार्ग
- १६ ऑगस्ट रोजी परळी आणि गोपीनाथगडावरून या यात्रेची सुरुवात. १६ रोजी परळी, गोपीनाथगड, गंगाखेड, पालम, लोहा, नांदेड.
- दुसऱ्या दिवशी (१७ जुलै) नांदेड, अर्धापूर, कळमनुरी ते हिंगोली मार्गावरून यात्रा जाईल.
- १८ ऑगस्ट रोजी हिंगोली, जिंतूर आणि परभणी
- १९ रोजी परभणी, मानवत, पाथ्री, सेलू, परतूर, वाटूर ते जालन्यापर्यंत यात्रा येईल.
- २० रोजी जालना ते बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा ते औरंगाबाद असा यात्रेचा मार्ग आहे.
- २१ रोजी औरंगाबाद मार्गे दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर ते कन्नडपर्यंत यात्रा जाईल, अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली आहे.