परळी (बीड) :वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून १४ लाख रुपये उकळणाऱ्या दोघांवर १९ मे रोजी संभाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून दोघांना २४ तासांच्या आत पुण्यातून ताब्यात घेतले. २३ मे रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
मनीषा नंदकिशोर फड (रा. माधवबाग, परळी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी साक्षी ही २०२१ मध्ये नीट उत्तीर्ण झालेली आहे. त्यामुळे तिच्या प्रवेशासाठी पालक प्रयत्न करत होते. ५ फेब्रुवारी रोजी मनीषा यांचे दीर सुनील फड यांना फोन करून युवराज सिंग उर्फ सोनूकुमार व नितांत गायकवाड (दोघे रा. पुणे) यांनी आमची युव नेक्स्ट स्टेप एज्युेशन कन्सल्टन्स नावाची संस्था असल्याचे सांगून वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. पाच वर्षांसाठी ७५ लाख रुपये खर्च येईल, असेही सांगितले.
त्यानंतर पाँडेचरी येथे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून १४ लाख रुपये घेतले. मात्र, नंतर प्रवेश दिला नाही. फड यांनी पैसे परत मागितले तेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. फड हे पुण्यात संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले तेव्हा पैसे परत देणार नाही, असे सांगितले गेले. दरम्यान, आर्थिक व्यवहारांच्या तपशिलावरून १९ रोजी संभाजीनगर ठाण्यात युवराज सिंग उर्फ सोनूकुमार व नितांत गायकवाड (दोघे रा. पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चांद मेंडके, पो. ना. अमर सरवदे व सचिन सानप यांनी पुणे गाठले. दोघांनाही २४ तासांच्या आत अटक करून परळीला आणले.
फसवणुकीची रक्कम परत२१ मे रोजी परळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान त्यांनी उकळलेले १४ लाख काढून दिले. २३ रोजी कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, असे उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी सांगितले.