लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ बीड, बी. व्ही. वाघ यांनी गुरुवारी ही शिक्षा ठोठावली.
सखाराम उत्तम माळी असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे, तर शीलाबाई उर्फ कौतिकाबाई माळी असे त्याच्या पत्नीचे नाव होते. गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथे २१ जुलै २०१५ रोजी दगडी मळा शिवारात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सखाराम व त्याची पत्नी शीलाबाई हे सरपण आणण्यासाठी गेले होते. सखाराम त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातच त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. यातूनच सखारामने शीलाबाईचा गळा धरुन तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले होते.
पत्नीचा खून करुन सखाराम हा स्वत:हून बीडला आला. पोलीस नियंत्रण कक्षात जाऊन त्याने घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. विशेष म्हणजे बीडला येताना सखारामने एका व्यक्तीला घटनेबद्दल संपूर्ण माहिती दिली होती. सखारामच्याच फिर्यादीवरुन त्याच्यावरच ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणाचा तपास गेवराईचे तत्कालीन पोलीस उप अधीक्षक चाफेकर व त्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी केला. त्यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आले होते.हे पुरावे ठरले महत्त्वाचेसखाराम पत्नीचा खून करुन ठाण्यात स्वत: हजर झाला. यावेळी त्याच्या अंगावरील कपड्यावर आढळलेले रक्ताचे डाग व इतर परिस्थितीजन्य पुरावे त्याला शिक्षा ठोठावण्यासाठी महत्त्वाचे ठरले. अजय दि. राख यांनी युक्तिवाद केला.
१४ साक्षीदार तपासलेसदरील प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ बीड, बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन सखारामला भादंविचे कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल बिनवडे यांनी मदत केली.