गर्भपातासाठी सासरच्या दबावास कंटाळून महिलेने घेतले पेटवून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 07:39 PM2018-04-20T19:39:55+5:302018-04-20T19:39:55+5:30

दोन महिन्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेस तिच्या पतीने आणि सासूने गर्भपात करण्यासाठी सातत्याने छळ केल्याने हताश झालेल्या महिलेने अखेर स्वत:स पेटवून घेतल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे घडली.

The woman gets tired of maternal mortality in her miscarriage | गर्भपातासाठी सासरच्या दबावास कंटाळून महिलेने घेतले पेटवून 

गर्भपातासाठी सासरच्या दबावास कंटाळून महिलेने घेतले पेटवून 

ठळक मुद्देसध्या पूजा दोन महिन्यांची गर्भवती आहे. आधीचे तीन मुले असल्याने पती मनोहर आणि सासू पार्वती या दोघांनी गर्भपात कर म्हणून पूजाकडे तगादा लावला होता

माजलगाव : दोन महिन्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेस तिच्या पतीने आणि सासूने गर्भपात करण्यासाठी सातत्याने छळ केल्याने हताश झालेल्या महिलेने अखेर स्वत:स पेटवून घेतल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे घडली. या घटनेत ही महिला ९५ टक्के भाजली असून तिच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती व सासूविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पूजा मनोहर निवळे (३४) असे पीडित महिलेचे नाव आहे. तिचा पहिला पती मरण पावल्यानंतर १५ वर्षापूर्वी तिचे दुसरे लग्न मनोहर केरबा निवळे (रा. तेलगाव, ता. माजलगाव) याच्यासोबत झाले. मनोहरचेही हे दुसरे लग्न होते. त्याची पहिल्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. मनोहरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले तर पूजापासून एक मुलगा झाला. 

सध्या पूजा दोन महिन्यांची गर्भवती आहे. परंतु, आधीचे तीन मुले असल्याने पती मनोहर आणि सासू पार्वती या दोघांनी गर्भपात कर म्हणून पूजाकडे तगादा लावला होता आणि त्यासाठी त्रास देत होते. सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घराची कडी आतून लावून घेतली आणि रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. अचानक मोठा जाळ झाल्याचे दिसल्याने मनोहरने पळत येऊन पूजाला विझविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मनोहर देखील भाजला आहे. 

गंभीर भाजलेल्या पूजाला तिच्या भावाने आणि चुलत्याने आधी माजलगावच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर बीड येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असे पूजाने जबाबात सांगितले आहे. ९५ टक्के भाजलेल्या पूजाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. याप्रकरणी पूजाचा पती आणि सासूवर कलम ४९८-अ, ३४ अन्वये माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The woman gets tired of maternal mortality in her miscarriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.