अंबाजोगाई (बीड ) : येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय उपचारासाठी चांगले असल्याची ख्याती सर्वदुर पोहोचल्याने परभणी जिल्ह्यातील एक महिला १ एप्रिल रोजी स्वारातीमध्ये उपचारासाठी आली असताना क्ष-किरण विभागातील लिपीकाने सदरील पिडीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या आरोपीविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे.
परभणी जिल्ह्यात सासर व अंबाजोगाई माहेर असल्याने सदरील पिडीत महिला सोमवारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील प्रभाग २ वार्डामध्ये डॉक्टरांना दाखविण्यासाठी आली होती. डॉक्टरांनी तीला सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी कुठलाही आजार नाही तुम्ही घरी जावू शकता असा सल्ला दिला. मात्र, क्ष-किरण विभागातील लिपीक सुधीर केंद्रे या कर्मचार्याने त्यांना आपल्या दालनामध्येच बसवून घेतले. संशय आल्याने महिलेने तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता केंद्रे याने तिला दालनामध्ये अडवून, तु मला आवडतेस, असे म्हणून तिला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला.
या प्रकारानंतर महिलेने तिच्या भावांना या घटनेची माहिती दिली. मात्र त्यांनी तू तुझ्या पतीला झालेल्या प्रकाराची माहिती दे म्हणुन सांगितले. त्यानंतर तिने पंढरपुर येथे जावून आपल्या पतीला घटनेची सविस्तर माहिती दिली. यानंतर पिडीत महिलेने पोलिस ठाणे गाठून झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात कलम३५४ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. अरूण मोरे करत आहेत.