'ऐ, वाचवा ना कुणीतरी...'; बीडमधील थरारक घटनेत मृताच्या पत्नीची बघ्यांना मदतीसाठी आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:45 PM2018-12-20T15:45:26+5:302018-12-20T15:46:57+5:30
आजही नागरिक गंभीर घटनेत मदतीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.
बीड : '' ऐ वाचवा, वाचवा ना कुणितरी..., उचला रे कुणीतरी.. '', हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परीक्षा देऊन परतणाऱ्या सूमितवर प्रेमप्रकरणातून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमितला वाचविण्यासाठी भाग्यश्री मदत मागत होती. मात्र उपस्थितांनी केवळ फोटो आणि व्हिडीओ बनविण्यातच धन्यता मानली.
जर सुमितला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असते तर ‘माझं लेकरू वाचलं असतं’ असा टाहो सुमितच्या आईने फोडला. या घटनेवरून आजही नागरिक गंभीर घटनेत मदतीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. माणूसकी शिल्लक नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहेत.
दरम्यान, काही वेळानंतर गर्दीतीलच तीन चार मुलांनी पुढे येत एका रिक्षात टाकून सुमितला जिल्हा रूग्णालयात आणले. मात्रे तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांची पाच पथके नियूक्त केली असून ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत.