यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा उतारा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:17+5:302021-03-15T04:29:17+5:30
अंबाजोगाई : तालुक्यात सध्या हरभऱ्याचे खळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, खळे झाल्यानंतर रब्बी हंगामातील हरभऱ्याचा उतारा मोठ्या प्रमाणात ...
अंबाजोगाई : तालुक्यात सध्या हरभऱ्याचे खळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, खळे झाल्यानंतर रब्बी हंगामातील हरभऱ्याचा उतारा मोठ्या प्रमाणात घटला असून, हरभरा लागवडीचा खर्चही निघेना, अशी स्थिती झाली आहे.
क्षेत्र वाढले. मात्र, उत्पादन घटले
एका एकरात चार ते पाच कट्टे निघाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून हरभऱ्याच्या पेऱ्याला प्राधान्य दिले. महागडे बियाणे व महागडी रासायनिक खते खरेदी करून हरभऱ्याची पेरणी केली. पाण्याची उपलब्धता असल्याने हरभऱ्याला पाणीही देण्यात आले. मात्र, वातावरणातील बदलामुळे हरभऱ्याला ग्रासले. वातावरणातील बदलामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. महागडी कीटकनाशके फवारूनही काही फरक पडला नाही. हरभऱ्याचा पेरा झाल्यानंतर फिरणारी धुई व निर्माण झालेल्या सततच्या ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचा उतारा घटला. आता खळे सुरू असताना एकरी चार ते पाच कट्टेच निघू लागले आहेत. झालेला खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. यावर्षी स्थिती चांगली असूनही उताऱ्यात घट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.