तरुण प्रवाशाला आली चक्कर; बस थेट जिल्हा रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:43 AM2019-09-18T00:43:31+5:302019-09-18T00:43:57+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरूणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर चालकाने थेट बस जिल्हा रूग्णालयात आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरूणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर चालकाने थेट बस जिल्हा रूग्णालयात आणली. येथे त्या तरूणार उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना बीड शहरानजीक घडली.
परळी-पाटोदा ही बस क्र. (एमएच २० बीएल ०८०७) मंगळवारी सकाळी परळी येथून प्रवाशांना घेवून पाटोद्याकडे निघाली होती. दिंद्रुड येथून आत्माराम व्हरकटे (२५, रा.व्हरकटवाडी, ता.धारुर) हा तरुण बीडला येण्यासाठी बसमध्ये बसला. बस बीड नजीक आलेली असताना अचानक या तरूणाला चक्कर आली. त्यानंतर सर्वच प्रवासी घाबरून गेले. चालक-वाहकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बस थेट जिल्हा रूग्णालयात आणली. तात्काळ रूग्णालयात दाखल केले.
डॉ. मनोज घडसिंग व त्यांच्या टीमने त्याच्यावर तात्काळ उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
उपचारानंतर रूग्णालयातून पलायन
आत्मारामवर अपघात विभागात तात्काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने कोणालाही न सांगता रूग्णालयातून काढता पाय घेतला. त्याचे केस पेपर मात्र, रूग्णालयातच होते. दुपारी १२ च्या सुमारास तो तरूण रूग्णालयातून निघून गेला होता.