बीड : वडिलांविरोधात पोलीस तक्रार घेत नसल्याचा अरोप करीत विनायक अतुल जव्हेरी (१७ रा.कबाड गल्ली, बीड) या तरूणाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे.
विनायक म्हणाला, वडिलांनी माझ्यावर १०० रूपये चोरल्याचा आरोप केला. मला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मी भयभीत होऊन अधीक्षक कार्यालय गाठले. येथून मला शहर पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगितले. येथील पोलिसांनी तक्रार घेणार नाही, असे सांगितले. त्यामुळे मी वैतागलो होतो. भाजीमंडईतून विषारी द्रव्य घेऊन पुन्हा मी अधीक्ष कार्यालयात गेलो. परंतु पुन्हा मलातेच उत्तर मिळाल्याने मी संतापून परिसरात येऊन ते द्रव्य प्राशन केले, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनीच मला रूग्णालयात आणल्याचेही तो म्हणतो.घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि. सुलेमान सय्यद यांनी रूग्णालयात धाव घेतली होती. उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
किराया देण्यासाठीचे पैसे चोरलेयाबाबत विनायकचे वडील अतुल जव्हेरी म्हणाले, घरभाडे देण्यासाठी मी सकाळीच खिशात दीड हजार रूपये ठेवले होते. यातील १०० रूपये विनायकने चोरले. मी केवळ विचारले होते. तो काहीपण बोलतो. एक तर काम काही करत नाही, उलट आम्हालाच त्रास देतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे पोनि सुलेमान सय्यद म्हणाले.