क्वारंटाईन राहण्यास सांगितल्याने तरुणाची ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 02:59 PM2020-08-08T14:59:57+5:302020-08-08T15:02:00+5:30
नियमानुसार त्याला क्वारंटाईन राहण्याबाबत ग्रामपंचायतकडून बजावण्यात आले होते.
अंबाजोगाई (जि. बीड ) : पुण्याहून आलेल्या तरुणास सरपंच व ग्रामसेवकाने क्वारंटाईन राहण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्या तरुणाने भावाला सोबत घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धुडगूस घालत एक लाख रुपयांच्या साहित्याची तोडफोड केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली.
पट्टीवडगावचे ग्रामसेवक साहेबराव महादेव भताने यांनी याप्रकरणी बर्दापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. अमोल बाबूराव लव्हारे (रा. पट्टीवडगाव) हा पुण्याहून गावाकडे आला होता. त्यामुळे नियमानुसार त्याला क्वारंटाईन राहण्याबाबत ग्रामपंचायतकडून बजावण्यात आले होते. त्यामुळे संतापलेल्या अमोलने भाऊ महेश बाबूराव लव्हारे याच्यासोबत बुधवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालय गाठले.
अमोलला क्वारंटाईन राहण्यास का सांगितले, अशी विचारणा करीत त्या दोघांनी कार्यालयाच्या एका खोलीचा दरवाजा दगड व लाथा मारून तोडला. त्यानंतर लोखंडी कपाट, टेबल, खुर्ची, संगणक व इतर साहित्याची नासधूस केली. तसेच दुसऱ्या एका खोलीची खिडकी तोडली. या तोडफोडीत ग्रामपंचायत कार्यालयाचे एक लाख एक हजारांचे नुकसान झाले. हा सगळा धुडगूस उपसरपंच सुमित्रा उत्तम वाकडे व पाणीपुरवठा कर्मचारी इंद्रजित तारसे यांच्यासमोर सुरू होता. या प्रकाराबाबत सरपंच प्रभावती कांबळे यांनी ग्रामसेवकास माहिती दिली.
दोघांविरुद्ध गुन्हा
ग्रामसेवक भताने यांनी कार्यालयात पोहोचून पाहणी केली आणि पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी अमोल बाबुराव लव्हारे व महेश बाबुराव लव्हारे यांच्यावर बर्दापूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहा. फौजदार गित्ते करत आहेत.