आनंद तरंग: विषयाची पारख पारखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:24 AM2020-07-03T00:24:20+5:302020-07-03T00:24:47+5:30
भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो.
बा. भो. शास्त्री
विषय म्हणजे विषयांचं ज्ञान होय. भोग्य वस्तूचा उचित भोग घेणारा. कोणत्या ऋतूत कोणता पदार्थ आणि किती प्रमाणात सेवन करावा, सकाळी कोणता, दुपारी आणि सायंकाळी कोणता खावा, याची ज्याला जाणीव आहे असा. खरं तर निसर्गाने आधीच स्वयंपाक केला आहे. माणसाने त्यात हस्तक्षेप केला. केवळ काकडी खाताना जो आनंद मिळतो, तो मीठ व तिखट लावल्याने मिळत नाही. चव हे जिभेचे चोचले आहेत. देहाची गरज नाही. पशू-पक्षी नैसर्गिक आहार घेतात. ते आहारात ढवळाढवळ करीत नाहीत. हत्ती बलवान, सिंह पराक्रमी, गरुडाची भरारी आणि वानराचं काटक शरीर, कारण ते निसर्गाच्या जवळ आहेत. आंब्याच्या रसात निसर्गाने साखर प्रमाणात टाकलेली असतेच. आम्ही वरून जास्तीची टाकतो. आम्ही खूप पदार्थांत भेसळ केली. मूळ पदार्थांचा स्वभाव बदलला.
विषम स्वभावाचे पदार्थ एकत्र करून खात असतो. त्याचा देहावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण भोग भोगत नसून, रोगच भोगत आहोत. भोगाची यादी वर दिलेलीच आहे. त्यात सर्व आहार सुखं आहेत. यथोचित भोग घेता आला नाही तर भोगातच रोग जन्माला येतात. उचित भोग घेणारे तीन सांगितले आहेत. भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो. जो विषयी आहे, त्याला त्याचा संतुलित आहारच सांभाळत असतो. या भोगाने भोगी तुष्ट होतो. पुष्ट होतो, श्रेय मिळते. आम्ही श्रेय सोडून प्रेयच्या मागे धावतो. प्रेयचा अतिरेक झाला आहे. जेवण अती, मोबाईलचा वापर अती. प्रवास अती, व्यसनं अती, जागरण अती, ते पोषक की घातक याचं ज्ञान नाही. श्रेयस्कर काय आहे, याचा विवेक नाही. रुचलं पाहिजे एवढंच सामान्यांना कळतं. विषयांचा ज्याला अभ्यास आहे, त्यालाच सूत्रात विषया म्हटलेलं आहे.