आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:28 AM2020-07-04T04:28:06+5:302020-07-04T04:28:23+5:30
आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते.
नीता ब्रह्मकुमारी
‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा...’, हे गीत प्रसिद्ध आहे. मनुष्याबरोबर सतत राहणारी त्याची सावली. ही सावली प्रत्येकाची आपली आपली. कधी पुढे तर कधी पाठी. पण नेहमीच साथ देणारी. सूर्याशी जसा आपला संबंध त्यानुसार लहान-मोठी होणारी ही सावली. शाळेत असताना भूगोल शास्त्रात शिकविले जायचे की सूर्यासमोर उभे राहिले की आपली सावली आपल्या पाठीमागे असते. पण जर सूर्याशी पाठ करून उभे राहिले तर सावली आपल्या पुढे-पुढे चालते. पण या शास्त्राच्या नियमांत अनेक रहस्ये लपलेली आहेत. आपले कर्म सावलीसारखे आपल्यासोबत चालते. सावलीला कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही ती वेगळी होऊ शकत नाही. तसेच कर्मापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याच वेगाने आपल्यासोबत धावत राहतात. हे कर्म फक्त एका जन्मापर्यंत पाठलाग करत नाही तर जन्मोजन्मी आपल्यासोबत चालतात. एखादी घटना घडली की आपण म्हणतो ‘माहीत नाही हे कोणत्या कर्माचे फळ आहे’. मग ती घटना सुखाची असो वा दु:खाची. आपण एखाद्या व्यक्ती अथवा वस्तूमागे जितके धावतो तितकेच ते दूर जातात. पण त्याकडे पाठ केली की ते आपल्या पाठी-पाठी येतात. आयुष्यात असे अनेक प्रसंग अनुभवतो. काही गोष्टींमध्ये नशिबाचा भागही असतो. प्रयत्नशील राहण्याची मात्र गरज आहे. आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. पण जेव्हा ईश्वराकडे पाठ करून वैभव, व्यक्ती, वस्तूंना साध्य करण्यासाठी धावतो तेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. ईशभक्ती आपल्याला शक्ती, मदत तसेच अचूक कर्म करण्याचा रस्ता दाखविते. ईश्वराशी बुद्धीने जोडलेले असल्याने चांगले-वाईटाची समज मिळते म्हणूनच नेहमीच त्या सूर्याकडे आपली नजर असावी.