आनंद तरंग: वैश्विक अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:45 AM2020-08-24T00:45:55+5:302020-08-24T00:46:09+5:30
व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात.
इंद्रजित देशमुख
जगणं म्हणजे दररोज शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या अनुभवाने समृद्ध होणे आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाची दररोजची अनुभूती आणि तिचा अर्थ वेगवेगळा आहे. व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात. त्यामुळे ज्या पातळीवर राहतो, त्या पातळीवरचे अनुभव घनदाट होतात. प्रतिदिन हा अनुभवाचा स्तर वाढत जाऊन वैश्विक सत्याच्या अनुभूतीपर्यंत पोहोचणे, ही परिपक्वता आहे. ही परिपक्वता सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. कारण, व्यक्तीला येणारा अनुभव हा त्याची परिस्थिती, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्याच्यासोबत घडणाºया घटना यांच्या संयोगातून येत असतो. त्यामुळे त्यावर त्याची अनुभूती ठरत असते. मी फुलांचा व्यापारी आहे आणि गुलाबांची बाग पाहिली की माझा अनुभव फुलांचा दर ठरवेल. मी गुलकंदाची निर्मिती करतो, तर त्याच फुलांचा माझा अनुभव या फुलांपासून गुलकंद किती होईल हे ठरवितो. मी भक्त आहे, तर ईश्वराच्या निर्मितीने मला आश्चर्य वाटून मी नतमस्तक होईन. परिपक्वतेसाठी समग्रतेने आकलन होणे आणि त्याच समग्रतेच्या अनुभवात अंतर्बाह्य भरून राहणे, हेच तर ज्ञान्याचे ध्येय
असते. हे अनुभवाचे सुखच विधायक अनुभूतीकडे घेऊन जाते. म्हणून माउली म्हणतात,
‘‘का जे यया मनाचे एक निके
जे देखिले गोडीचिया ठाया सोके,
म्हणौनि अनुभव सुखाचे कवतिके
दावीत जाईजे’’
हीच व्यापक अनुभूती, हे विश्वच माझे घर आहे आणि चराचरामध्ये मीच आहे, याचा निश्चय होऊन आनंद भोगत जगतो.