अनंत या शब्दाचा अर्थ अंत नसलेला असा असून या शब्दामागील संकल्पना अत्यंत विशाल आहे. 'अनंत' हे श्रीविष्णूचे नाव आहे. महाभारतामध्ये खुद्द श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याचे गतवैभव परत मिळावे म्हणून अनंताचे व्रत करायला सांगितले असा उल्लेख आहे. या व्रताच्या निमित्ताने भगवंताने आपल्या विश्वरूपाचे वर्णन युधिष्ठीरासमोर केले. या व्रताचे सार हे आहे, की चराचरात अनंतरूपी परमात्मा व्यापून उरलेला आहे. ही जाणीव ठेवून संसारातील कर्म केले असता प्रत्येक तत्त्वामध्ये परमेश्वराचे दर्शन घडते. हातून सत्कार्य घडते. ईश्वरभक्तीचा उमाळा येतो आणि विश्वरूपातील अनंताचे दर्शन घडते. तो अनंत सहस्त्र करांनी आपल्या प्रयत्नांना यश देतो आणि गतवैभव प्राप्त होण्यास सहकार्य करतो, अशी या व्रताची ख्याती आहे.
अनंत व्रत हे काम्यव्रत अर्थात ईच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे. नोकरी-व्यवसायातील बढती, आर्थिक वृद्धी, वैभव, पद-प्रतिष्ठा अशा गोष्टी साध्य करण्यासाठी हे व्रत केले जाते. मनुष्याच्या उमेदीच्या काळात म्हणजेच तरुणपणात हे व्रत विशेषत: केले जाते. कारण हे व्रत करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता त्या वयात असते. सलग १४ वर्षे हे व्रत करावे लागते. कुटुंबातील कोणाची इच्छा असेल, तर चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर इच्छुक व्यक्तीच्या हाती हे व्रत सोपवता येते.
हे व्रत श्रद्धेने करावे. इच्छा नसताना, बळजबरीने, कोणाच्या सांगण्यावरून ते करू नये. तसे असल्यास किंवा प्रापंचिक अडचणींमुळे व्रतामध्ये खंड पडणार असल्यास व्रताचे उद्यापन करावे. परंतु अश्रद्धेने व्रत करू नये असे धर्मशास्त्र सांगते. व्रत मध्येच स्थगित केल्याने कोणतेही पाप लागत नाही. कुटुंबातील ब्रह्मचारी मुलाकडून, पुरोहितांकडून किंवा आप्तनातलगांकडून या व्रताचे उद्यापन करून घ्यावे. आणि व्रत करण्याची इच्छा असल्यास सलग चौदा वर्षे करावे.
Ganesh Festival 2021 : शास्त्रानुसार गणेशमूर्तीचे विसर्जन कितव्या दिवशी करणे योग्य ठरते, ते वाचा!
सद्भावनेने हे व्रत केले असता भगवंताच्या अनंत रूपाची प्रचिती येते, एवढेच नव्हे तर प्रत्येक जीवात परमात्म्याचे दर्शन घडते, असा भाविकांचा अनुभव आहे. इच्छुकांनी प्रचिती घ्यावी.