आज वारीला जाऊ न शकलेल्या प्रत्येक वारकऱ्याची तळमळ या अभंगात एकवटली आहे. या अभंगाला तुकाराम महाराजांनी लिहिलेली विरहिणी असे म्हटले तरी चालेल. विरहिणी अर्थात ओढ लावणारे, दर्शवणारे काव्य. सदर अभंगात तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली आहे, ते लिहितात -
भेटीलागी जीवा, लागलीसे आस।पाहे रात्रंदिवस, वाट तूझी।पूर्णिमेचा चंद्र, चकोरा जीवन।तैसे माझे मन वाट पाहे।दिवाळीच्या मूळा, लेकी आसावली।पहातसे वाटुली, पंढरीची।भुकेलिया बाळ, अति शोक करी।वाट पाहे परी, माउलीची।तुका म्हणे मज, लागलीसे भूक।धावूनि श्रीमुख दावी देवा।
देवा तुझ्या भेटीच्या आशेने मी रात्रंदिवस तळळतआहे. माझ्या जीवाला जराही स्वस्थता नाही. ज्याप्रमाणे चकोरासाठी पौर्णिमेचा चंद्र हा सारसर्वस्व असतो, तोच त्याच्या जगण्याचा आधार असतो. त्यामुळे चकोर नेहमी चंद्रोदयाची वाट बघत राहतो. देवा, माझे मनही तुझी अशीच वाट पाहत आहे. सासरी असलेली मुलगी दिवाळीला माहेरुन बोलावणे येईल म्हणून उत्सुकतेने सांगाव्याची, निरोपाची वाट बघत असते. तसाच मीदेखील विठुमाऊलीच्या दर्शनाची वाट बघत आहे. देवा, धावत येऊन मला तुझे श्रीमुख दाखव. असे तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहेत.
अशी आस निर्माण होते, तेव्हा भगवंत आपणहून भक्ताच्या भेटीला धावून येतो, अशी त्याची ख्याती आहे. आजही वारीचे स्वरूप नेहमीसारखे नसले, तरीदेखील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, कारण तनाने ते वारीत सहभागी झाले नसले, तरी मनाने ते वारी करत पंढरपुरापर्यंत नक्कीच पोहोचले असतील आणि उद्या त्या परब्रह्माच्या दर्शनाचा, भेटीचा दिवस येऊन ठेपला आहे. त्याबाबत ज्ञानोबा माउली आनंद व्यक्त करताना लिहितात-
रूप पाहता लोचनि, सुख झाले हो साजणी...
या अभंगाची गोडी उद्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चाखुया... तोवर जय हरी!