ज्योत्स्ना गाडगीळ
दासबोधाच्या प्रारंभी गणरायाला वंदन करून झाल्यावर समर्थ रामदासांनी शक्तीची अर्थात देवीची प्रार्थना केली आहे. कलियुगात देवी आणि गणेश या दोन देवतांची विशेष उपासना केली जाते. हे लक्षात घेता, समर्थांनी कार्यारंभी गणेशाला आणि पाठोपाठ शक्तीला वंदन केले आहे.
आता वंदीन वेदमाता, श्रीशारदा ब्रह्मसुता।शब्दामूळ वाग्देवता, महामाया।।
शक्तीची रूपे वेगवेगळी आहे. पैकी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही मुख्य रूपे आहेत. त्यांची आपण वेळोवेळी आळवणीदेखील करतो. सत्ता, संपत्ती, ऐहिक सुख, ऐषोआरामी जीवन जगण्यासाठी लागतो पैसा आणि तो मिळवण्यासाठी आराधना केली जाते, महालक्ष्मीची. कारण ती वैभव प्राप्त करून देणारी आहे. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग येतात. अशा वेळी संकटांना तोंड देण्यासाठी अंगात बारा हत्तींचे बळ यावे लागते. ते येणार कुठून? त्यासाठी महाकालीची उपासना. ती आपले धैर्य वाढवते, मनोबल वाढवते. तसेच आयुष्यभर आपण विद्यार्थी दशेत असतो. अनेक गोष्टींचे हळू हळू आकलन होते आणि आपला शिकण्याचा प्रवास सुरू राहतो. यासाठी वरदहस्त लागतो, तो देवी शारदेचा. तीच आपल्याला शस्त्र, शास्त्र, कला, साहित्य, वेद, वाङमय इ. गोष्टींमध्ये पारंगत होण्यासाठी अनुकूलता मिळवून देते.
हेही वाचा : नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने!
शक्तीशिवाय सृष्टीत चैतन्य निर्माण होणारच नाही. सगळेच जीव निर्जिव होतील. साधे उदाहरण पहा. आपल्याला हात आहेत, पाय आहेत पण ते वापरण्याचे अंगात त्राण नाहीत, मग ते असून उपयोग आहे का? काहीच नाही. हे चैतन्य म्हणजेच शक्ती. या शक्तीच्या बळावर सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडत आहे. हे लक्षात घेऊन समर्थ दुसरी ओवी देवीला समर्पित करताना म्हणतात, आता वंदीन वेदमाता.
एवढे लेखन साहित्य निर्माण करायचे, तर जी साहित्यसम्राज्ञी आहे, शब्दसम्राज्ञी आहे, भाषासम्राज्ञी आहे, तिचे आशीर्वाद घ्यायला नको का? वाकसिद्धी यायला देखील देवीचा आशीर्वाद लागतो, अन्यथा शब्द येत असूनही ऐनवेळेवर सुचत नाहीत. तोंडातून निघत नाहीत. जीभ आहे, दात आहेत, तोंड आहे म्हणून सगळ्याच जीवांना बोलता येते असे नाही. पशु-पक्ष्यांचाही परस्परसंवाद असतो. तेही बोलतात. परंतु ते स्वरात बोलतात. शब्दांची भाषा कळते, ती फक्त मनुष्याला. ते शब्दही नको तिथे, नको तसे वापरून उपयोग नाही. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कसे बोलायचे, हे कळायला वयाची दोन वर्षे पुरतात, परंतु काय बोलायचे हे कळायला संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते.
ज्यांना भाषेवर प्रभुत्त्व मिळवता येते, ज्यांच्याकडे ज्ञानाचा मोठा स्रोत असतो, असे लोक शारदेचे उपासक अर्थात सारस्वत म्हणून ओळखले जातात. असाच एक सारस्वत होऊन समर्थ रामदास देवीला शरण येतात. कारण, शब्दांचे मूळ ती आहे. मनाच्या श्लोकातही समर्थांनी लिहून ठेवले आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा' म्हणजेच जीभेला, शब्दांना सुयोग्य वळण देणारीसुद्धा तूच आहेस. म्हणून हे शारदे, माझा नमस्कार स्वीकार कर. मला जो बोध झाला, तो ग्रंथरुपाने लिहून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.'
हेही वाचा : दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!