आषाढ शुद्ध एकादशीच्या शुभमुहूर्तावर भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात. त्याला भाद्रपद शुक्ल एकादशीला बरोबर दोन महिने पूर्ण होतात. म्हणून तो मुहूर्त साधून देवाचे भक्त देवाची झोपमोड होऊ न देता त्याची कूस बदलतात, ती भाद्रपद शुक्ल एकादशीला! तो विधीदेखील भक्तांसाठी एक उत्सवच असतो, त्याला कटिपरिवर्तनोत्सव असे नावही दिले आहे. यावेळी सगळे पूजाविधी हे प्रबोधिनी एकादशीसारखेच असतात. देवाला स्नान घालून रथयात्रा काढली जाते. संध्याकाळी महापूजा करून आरती केली जाते. रात्री देवाला उजव्या कुशीवर निजवले जाते. या रात्री भजन कीर्तनासह जागरण केले जाते. दुसऱ्या दिवशी द्बादशीला-
वासुदेव जगन्नाथ प्राप्तेयं द्वादशी तव,पार्श्वेन परिवर्तस्व सुखं स्वपीहि माधव।
अशी प्रार्थना करून मग एकादशीच्या उपासाचे पारणे करतात. हा सोहळा भक्ताच्या भोळ्या भावाचे आणि भगवंताप्रती असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवतो. देव एकाच कुशीवर सलग चार महिने कसे झोपणार? या विचाराने भक्तांनी देवाच्या आवडत्या तिथीचे अर्थात एकादशीचे निमित्त साधून देवाची कूस वळवली आहे. विश्रांती घेत असताना देवाचे अंग दुखू नये, हात दुखू नये म्हणून भक्तांनी काळजी घेतली आहे. `यथा देहे तथा देवे' म्हणजेच ज्या भावना, पीडा आपल्या देहाला होतात, तशाच देवालाही होत असतील या कल्पनेतून भक्तांनी समारंभपूर्वक देवाची कूस वळवण्याचा कार्यक्रम आखला आहे. आजही अनेक विष्णूमंदिरांमध्ये कटाक्षाने सारे नियम पाळून ही प्रथा पाळली जाते. तो सोहळा प्रेक्षणीय असतो.
भक्तांचा भोळा भाव पाहून देवालाही भक्तांप्रती आत्मियता वाटली नाही तरच नवल! देव भक्तांची काळजी वाहतो, भक्त देवाची काळजी वाहतात. असे हे परस्परांचे सुंदर नाते आहे आणि त्याच नात्याचे मनोहारी दर्शन घडवणारी प्रथा म्हणजे कटिपरिवर्तनोत्सव!