मेंदूपर्यंत रक्ताभिसरणासाठी रोज किमान चार वेळा नमस्कार करा; जाणून घ्या कसा!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 24, 2020 03:07 PM2020-11-24T15:07:31+5:302020-11-24T15:09:40+5:30
नमस्काराचे अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदे आहेत. परंतु, नमस्काराचा मुख्य फायदा म्हणजे आपल्यातला अहंकार दूर होतो आणि आपण शरणागतीच्या अवस्थेत येतो.
ज्योत्स्ना गाडगीळ
आपण ज्या पद्धतीचा नमस्कार करतो, तो पाहून कितीदा देवही मनातल्या मनात खुदकन हसत असेल. डॉ. संजय उपाध्ये त्यांच्या व्याख्यानात नमस्काराच्या पद्धतींचे वर्णन करताना मिस्किलपणे म्हणतात, 'कोणते इशारे कुठे करावेत, हेही आजच्या तरुणांना कळत नाही.' गमतीचा भाग सोडा, परंतु नमस्कार कसा करावा, हे शास्त्रात व्यवस्थित समजावून सांगितलेले आहे.
नमस्काराचे अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक फायदे आहेत. हो हो आर्थिकही! लहान मुलांनी नमस्कार केला, की आजही मोठ्यांकडून त्यांना खाऊसाठी पैसे मिळतात, मग तोही फायदा लक्षात घ्यायलाच हवा.
हेही वाचा : देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी - समर्थ वचनाचा प्रत्यय देणरी बोधकथा!
परंतु, नमस्काराचा मुख्य फायदा म्हणजे आपल्यातला अहंकार दूर होतो आणि आपण शरणागतीच्या अवस्थेत येतो. अहंकार दूर झालेली व्यक्ती ज्ञान, सत्कार, आशीर्वाद, सद्भावना, सदिच्छा यांसाठी पात्र होते. त्यासाठी झुकावे लागते. तेदेखील कुठेही नाही, तर योग्य व्यक्तीसमोरच झुकले पाहिजे. म्हणून नमस्काराचा एक नियम आहे, 'ज्याचे आचरण शुद्ध आहे, अशाच व्यक्तीचे चरण धरावे.'
बोट दिले, तर हात धरणे ही परकीय संस्कृती आहे. मात्र, आपले सर्वस्व दुसऱ्याच्या पायी समर्पित करणे, ही हिंदू संस्कृती आहे. एकमेकांना अभिवादन करताना हात जोडून व शिर झुकवून नमस्कार करावा. हिंदू धर्मशास्त्रातील ही अभिवादनाची पद्धती अत्यंत शास्त्रशुद्ध व स्तुत्य आहे. समाजामध्ये वावरताना एकमेकांच्या शरीरस्पर्शामुळे आरोग्यदृष्ट्या अनिष्ट संसर्ग घडेल, अशी कुठलीही अभिवादन पद्धती हिंदू धर्मात स्वीकारलेली नाही. कोरोनाकाळात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर राजकीय व्यक्तींनी हात जोडून अभिवादन करण्यालाच पसंती दिली. यावरून भारतीय संस्कृतीची आखणी किती दूरदृष्टीने केली आहे, हे लक्षात येईल.
साष्टांग नमस्कार : देवाला नमस्कार करताना आरती झाल्यावर अनेक जण साष्टांग नमस्कार करतात.
उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा,
पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते।
म्हणजेच, वक्षस्थळे, मस्तक, नेत्र, मन, वाणी, हात, पाय, गुडघे या आठ अंगांनी केलेला साष्टांग नमस्कार, याला दंडवत असे म्हणतात. साष्टांग नमस्कारात देवासमोर बिनशर्त शरणागती घेतली जाते. त्याचप्रमाणे सत्पुरुषांना नमस्कार करतानादेखील साष्टांग नमस्कार करावा, असे आपली संस्कृती सांगते.
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींना नमस्कार : आई, वडील, गुरुजन, नातेवाईक, अनुभवाने, ज्ञानाने, कलेने, अधिकाराने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीला नमस्कार करताना, पायावर उकीडवे बसून समोरच्या व्यक्तीच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार करावा.
शिष्टाचाराचा नमस्कार : दैनंदिन जीवनात भेटणाऱ्या परंतु, अनुकरणीय असणाऱ्या व्यक्तींना हात जोडून नमस्कार करावा. काही परिसरात, नमस्कार केलेला चालत नाही. कारण, ते लोक सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहतात, त्यामुळे दुसऱ्यातल्या परमेश्वराला आपल्यासमोर झुकवणे अयोग्य मानतात. अशा वेळी केवळ अभिवादन करून नमस्कार किंवा गावाकडील पद्धतीनुसार 'राम राम' म्हणतात. अशा पद्धतीने नमस्कार करून, समोरच्या व्यक्तीला मान देणे, हा शिष्टाचार समजला जातो.
नमस्काराचे हे प्रकार शास्त्रशुद्ध असले, तरीदेखील फसव्या, लुबाडणाऱ्या, खोटे बोलणाऱ्या लोकांना दुरूनच कोपरापासून नमस्कार करावा. स्वार्थासाठी, मर्जी राखण्यासाठी अयोग्य व्यक्तीला नमस्कार करू नये. तसे केल्याने समोरच्या व्यक्तीचा खोटा अहंकार सुखावतो आणि आपल्या संस्कारांना कमीपणा येतो.
यासगळ्या धार्मिक, सांस्कृतिक गोष्टींना विज्ञानाने पुष्टी दिली, की विचारांचे पारडे जड होते. म्हणून शीर्षकात म्हटल्याप्रमाणे, मेंदूला रक्ताभिसरण व्हावे, म्हणून रोज किमान चार वेळा खाली वाकून नमस्कार करावा. म्हणून तर सूर्य नमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटले आहे. पायावर डोके ठेवल्याने किंवा साष्टांग नमस्कार केल्याने शारीरिक हालचाल होते, लवचिकता वाढते आणि विनम्रता अंगी बाणते. म्हणून यापुढे चमत्कारापुढे नमस्कार करणे सोडा आणि नमस्कार केल्यानंतर होणाऱ्या चमत्कारांचा अनुभव घ्या.
हेही वाचा : तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'