गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी : रामनामाची महती पटवून देत जनसेवा अन ईश्वरसेवा करणारे गुरु!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 7, 2021 05:11 PM2021-01-07T17:11:59+5:302021-01-07T17:12:31+5:30
ब्रह्मस्वरूपी विलीन झालेल्या महाराजांना आचारविचारात अजिबात मीपणा किंवा मोठेपणा नव्हता, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होते. महाराज भारतभर भ्रमण करून गोंदवले येथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी महान कार्ये केली. कित्येक विवाह जमवले. अनाथ मुलींना उत्तम स्थळे पाहून विवाह लावून दिले, सुखी केले. संसार साधून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग अनेकांना दखवला. मुक्या प्राण्यातही माणुसकीचा अंश त्यांना प्रेमाने वागवून निर्माण केला.
८ जानेवारी रोजी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची १०७ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणी उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच महाराजांनी दिलेला `श्रीराम जय राम जय जय राम' या मंत्राचे मोठ्या प्रमाणात सामुहिक पठण केले जाणार आहे. गोंदवलेकर महाराजांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही त्यांनी सुरू करून दिलेल्या सेवेत आजतागायत खंड पडलेला नाही. यावरुन महाराजांचा अधिकार किती मोठा होता, हे आपल्या लक्षात येईल. महाराजांचे कार्य एवढे मोठे आहे, की त्यांच्या पश्चातही आज जगभरात त्यांचे अनुयायी गुरुउपदेशाचे पालन करत आहेत. काय होते त्यांचे कार्य? जाणून घेऊया.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवले. त्यासाठी नामस्मरणाचा महिमा सांगितला. ते म्हणत, `एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. तुम्ही तुमच्यापाशी नाही, इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत रहा म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही. मी निर्लेप नामामध्ये राहतो. तुम्ही निर्लेप, निर्विकल्प, नाम घ्या. माझ्या सहवासाची प्रचीती आल्यावाचून राहणार नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलीकडे मला कसलीच अपेक्षा नाही. नाम घेणे म्हणजे माझ्या हातात आपला हात देणे होय. अशा रितीने ज्याने माझ्या हातात आपला हात दिला, तो मी सरळ रामाच्या हातात नेऊन पोचवला.
हेही वाचा : देवापर्यंत पोहोचायचे आहे? तर नाम घेतलेच पाहिजे!
मला रामावाचून दुसरा जिवलग कुणी नाही. एका नामावाचून मी आजपर्यंत कशाचीही आठवण ठेवली नाही. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्याच्या मागे पुढे मी आह़े मी तुमच्याजवळ आहे. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. वेदांती ज्याला ब्रह्म म्हणतात त्याला भक्त नाम असे म्हणतात. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही. नामाला सोडू नका. माझ्या गुरुंनी मला जग रामरूप बघायला सांगितले. ते तसे मी बघितले. मला तुम्ही सगळे रामरूप दिसता. जो मी सांगितल्याप्रमाणे वागेल त्याचे काम मी रामाचा हात धरून त्याच्याकडून करून घेईन. कारण रामानेच हे काम करायला मला सांगितले आहे.
महाराजांनी व्यसनाधीनांना व्यसनमुक्त केले. विषयासक्त व्यक्तींना ते मोठ्या प्रेमाने धडा शिकवित. रामनामाच्या सामर्थ्यावर मृत मुलगा जिवंत असल्याचे महाराजांनी दाखवून दिले. स्वत:च्या कर्तृत्त्वाने त्यांनी बोटीतील जीव वाचवले. पत्नीच्या पातिव्रत्याच्या पुण्याईमुळे व महाराजांच्या आशीर्वादाने दानधर्मी सावकार बांधलेल्या शिळीवरून उठून बसला. कित्येकांना मृत्यूसमयी त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन उत्तम गती प्राप्त करून दिली. भूत पिशाच्चाने पछाडलेल्यांची पीडा दूर केली.
ब्रह्मस्वरूपी विलीन झालेल्या महाराजांना आचारविचारात अजिबात मीपणा किंवा मोठेपणा नव्हता, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होते. महाराज भारतभर भ्रमण करून गोंदवले येथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी महान कार्ये केली. कित्येक विवाह जमवले. अनाथ मुलींना उत्तम स्थळे पाहून विवाह लावून दिले, सुखी केले. संसार साधून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग अनेकांना दखवला. मुक्या प्राण्यातही माणुसकीचा अंश त्यांना प्रेमाने वागवून निर्माण केला.
तळागाळातील सामान्यांना जातपातीची भीड न बाळगतात रामनामाच्या सामथ्र्यावर एकत्र आणले. महाराजांनी रामनामाचा जो दीप लावला, त्यातून आज लाख लाख ज्योतींचा प्रकाश उजळून निघत आहे.
महाराजांनी कसायाच्या हाती जाणाऱ्या अनेक गायी सोडवल्या. एकावन्न मंदिरे बांधली. मारुती मंदिरेही उभारली. अन्नदानाच्या पुण्याचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्यांना खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे, या तीन गोष्टी महाराजांना खूप आवडत असत. महाराज सांगत, या तीन गोष्टी जो करेल, त्याच्या हयातीत काहीही कमी पडणार नाही. आज गोंदवले येथे रोज मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते.अशी नानाविध जनसेवा आणि ईशसेवा करून इ. स. १९१३ मध्ये महाराज समाधिस्थ झाले.
हेही वाचा : तुम्ही खडीसाखर बना, गुरु तुमच्याकडे धावत येतील!