'अतिथी देवो भव' अर्थात अतिथीच्या रूपात आपण देवाला पाहतो आणि आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करतो. ही आपली संस्कृती आहे. आपण तिचे पालन करतो. परंतु, अतिथी रूपात येऊन ठगवणाऱ्या लोकांचीच सध्या जास्त चलती आहे. त्यामुळे अतिथी धर्माचे पालन करताना किंवा आपणही कोणाकडे अतिथी म्हणून जाताना पुढील सुचनांचे अवश्य पालन करावे.
>>घरी आलेल्या व्यक्तीचे 'या, बसा!' म्हणत स्वागत करावे (अर्थात ओळखिची असेल तरच अन्यथा आधी खात्री करून मगच घरात घ्यावे) आलेल्या अतिथीला पाणी देऊन मग संभाषण सुरू करावे.
>>जवळच्या नातलगांव्यतिरिक्त अन्य कोणीही परिचित अतिथी असतील, तरी त्यांना स्वयंपाकघर तसेच बेडरूममध्ये प्रवेश देऊ नये. अन्यथा बाहेरच्यांना आपल्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करण्याची संधी मिळते.
>>दुसऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर आपणहून आपले सामान एका कोपऱ्यात ठेवावे. रिकाम्या हाती जाऊ नये. काहीतरी खाऊ, भेट अवश्य न्यावी. त्यांच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप न करता आब राखून राहावे. आपली लुडबूड किंवा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.
>>एखाद्या समारंभानिमित्त जमलेल्या घरातून निघताना सर्व पाहुण्यांनी एकाच दिवशी निघू नये, त्यामुळे मागे राहिलेल्यांमध्ये विरह भावना वाढते. एक दिवसाचे अंतर ठेवून एकाने शेवटी निघावे.
>>अतिथी म्हणून आलेल्या व्यक्तीचा किंवा आपण अतिथी म्हणून जाताना अगत्यपूर्वक निरोप घ्यावा. पुन्हा येण्याचे आमंत्रण द्यावे. आपल्या वागण्या बोलण्यात कृत्रिमता नसावी.
>>निरोप घेताना जातो म्हणू नये, येतो म्हणावे. त्यातून पुनरागमन सुचित होते.
>>कोणाकडेही जास्त दिवस राहू नये. अकारण तर मुळीच थांबू नये. हवापालट झाल्यावर उचित वेळी मुक्काम हलवावा. अन्यथा पाहुणचारात अगत्य राहत नाही.