सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 19, 2020 07:30 AM2020-11-19T07:30:00+5:302020-11-19T07:30:02+5:30

आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक.

Different types of Aarti to invoke God! | सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार! 

सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार! 

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ

रोज सकाळी, दुरून कुठल्यातरी मंदिरातला घंटानाद आपल्या कानावर पडत असेल. तो घंटानाद आहे, काकड आरतीचा. मुख्यत्त्वे कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकड आरती सुरू असते. काकड आरतीच्या वेळी काकड्याने (वातीचा एक प्रकार) देवाला ओवाळले जाते, म्हणून या आरतीला काकड आरती म्हणतात. काकड आरतीची अनेक काव्ये प्रचलित आहेत. जसे की,

सत्व रज तमात्मक केला काकडा,
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतवला।

या दोन ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ, आत्मिक संवाद आणि भक्ती प्रगट होते. म्हणून आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक. आरती म्हणजे तबकात अथवा ताम्हणात निरांजनातील दीप प्रज्वलीत करून देवाला ओवाळणे. ही ओवाळणी काव्यपदातून  एका विशिष्ट चालीने म्हटली जाते. या पदामध्ये साधक ईश्वराच्या रूपाचे, पराक्रमाचे, कर्तृत्वाचे वर्णन करीत असतो. विशेषत: यात देवाची स्तुती असते. आरतीमुळे उपासकांना कृतार्थतेची जाणीव होते. तो देहभान विसरून परमेश्वराला शरण येतो. यासाठी साधकांनी आरत्यांचे आत्मविष्कार साधण्यासाठी विविध प्रकार केले आहेत ते असे- काकड आरती, धुपारती, दीपारती, पंचारती, शेजारती

हेही वाचा : Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (पूर्वार्ध)

काकड आरती - साधक दिवसाच्या प्रारंभी पहाटेच्या वेळी परमेश्वराची आळवणी करतो, त्याला काकड आरती म्हणतात. या उपचारातून साधकाची ईश्वराविषयीची निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त होत असते. तसेच जीवनाची नित्यकर्मे तो ईश्वराला अर्पण करतो. अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमापर्यंत मंदिरातून काकड आरती केली जाते. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती, स्तोत्रे म्हटली जातात. संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, संत एकनाथ आदि संतांनी केलेल्या रचना काकड आरतीनंतर गायल्या जातात.

धुपारती - धुपाने मंदिरात तसेच घरातील देव्हाऱ्यात देवाला ओवाळले जाते, त्या आरतीला धुपारती असे म्हणतात. सत्व, रज, तम हे त्रिगुण नाहीसे होऊन मनुष्याने गुणातीत व्हावे ही भावना या आरतीमागे असते. शिवाय धुपाचा वास सर्वत्र दरवळल्यामुळे त्या वासातून देवाचे अस्तित्व भासू लागते. 

दीपारती - साधक निरांजनाने देवाला ओवाळतो त्या निरांजनातील दिव्याचे तेज तो आपल्या डोळ्यात साठवत असतो. तेज हे देवाचे प्रतिक असल्यामुळे ही आरती केली असता साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.

पंचारती - पाच वातीचे एक उपकरण असते. त्यात फुलवाती लावल्या जातात. त्यानेच साधक आपले पंचप्राण ओतून देवाला ओवाळीत असतो किंबहुना आपले प्राण देवाला समर्पण करण्याची तयारी असते विशेष म्हणजे या आरतीमुळे साधक ज्योतीस्वरूपाने देवाच्या शुद्ध प्रेमाची अनुभुति घेतो. 

शेजारती - हा दिवसातील शेवटचा उपचार असून तो रात्री केला जातो. तसे पाहता देव हा सदैव जागृत असताना शेजारती करण्याचे कारण देव हा आनंदरूपी शेजेवर आहे, याचा अनुभव आपल्याला यावा हा भाव यात असतो. द्वैत स्थिती संपून अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी म्हणजेच देव व भक्त यांचे मीलन व्हावे यासाठी या आरतीचे प्रयोजन केले जाते. अशा रीतीने सकाळ संध्याकाळ व रात्रौ देवाची आरती केल्यानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालणे अगत्याचे आहे. 

प्रदक्षिणा - देवाभोवती भ्रमण करणे म्हणजे प्रदक्षिणा होय. या प्रदक्षिणेत एक सूत्र आहे ते असे की देवाच्या उजव्या बाजूने परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. याचे कारण असे की दैवी शक्ती ही मंत्राधिन असून तिचे तेजोवलय दक्षिणेकडे जात असते. प्रदक्षिणेच्या वेळी हे तेज नकळत भक्ताच्या शरीरात शिरते. त्यामुळे त्याचे मन पवित्र होऊन ते एकाग्रतेने देवासंबंधी विचार करते. म्हणजे देवाशिवाय अन्य विचार मनात देत नाहीत. थोडक्यात प्रदक्षिणा घालताना साधक देवाशी एकरूप होतो. अर्थात याला शंकराची प्रदक्षिणा अपवाद आहे. ती प्रदशिक्षणा अर्धी घातली जाते, तिला सोमसूत्री असे म्हणतात. कमीत कमी एकवीस वेळा प्रदक्षिणा घालण्याचा रिवाज आहे. यामुळे चालण्याचाही व्यायाम होतो. अशा रितीने देवपूजेचे सर्व सोपस्कार झाल्यानंतर देवाला नैवेद्य समर्पण करतात. 

हेही वाचा :Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (उत्तरार्ध)

Web Title: Different types of Aarti to invoke God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.