रामायणातील हा 'अवघड' प्रसंग अनेक स्त्रियांच्या आयुष्यात आजही येतो.
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 18, 2021 03:14 PM2021-01-18T15:14:55+5:302021-01-18T15:15:31+5:30
अनेकदा समज गैरसमजातून नात्यांची गुंतागुंत होते. हे सर्वसामान्य मानवी आयुष्यातील कंगोरे रामायणातही वाचायला मिळतात.
प्रात:स्मरणी पाच कन्यांमध्ये तारा या नावाचा समावेश आहे. वालीच्या पत्नीचे आणि अंगदाच्या मातेचे नाव जसे तारा होते, तसेच हरिश्चंद्राच्या पत्नीचे नावही तारा होते. त्यामुळे कोणत्या तारेचा सन्मान प्रात:कालीन वंदनात केला आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाही. परंतु, दोघींचाही गौरव त्यात आहे, असे आपण मानुया.
किष्किंधेच्या राज्यावर वाली नावाचा वानर राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव तारा आणि मुलाचे नाव अंगद. वालीच्या धाकट्या भावाचे नाव होते सुग्रीव. एकदा वाली आणि सुग्रीव, दुंदुभी राक्षसाचा भाऊ मायावी याचा पाठलाग करीत होते. मायावी एका मोठ्या गुहेत शिरल्यावर वालीही आत शिरला. त्याने सुग्रीवाला गुहेच्या दाराशी संरक्षण करण्याकरता ठेवले. त्यानंतर कित्येक महिने लोटले पण वाली बाहेर आला नाही.
एक दिवस रक्ताचा मोठा प्रवाह गुहेतून बाहेर वाहत आला. सुग्रीवाला वाटले मायावी राक्षसाला वालीने ठार मारले असावे. तो आतुरतेने वालीची वाट बघत होता. पण वाली बाहेर आला नाही. गुहेत सारे सामसुम होते. गुहा बरीच खोल होती. त्यामुळे सुग्रीवाला वाटले वालीदेखील मेला असावा. तेव्हा गुहेच्या दारावर एक मोठी धोंड ठेवून तो किष्किंधेला परत आला.
सर्वांच्या आग्रहास्तव सुग्रीवाने राज्यगादीवर बसण्याचे मान्य केले. परंतु पुढे काही महिन्यांनी वाली गुहेतून आला आणि त्याने सुग्रीवावर हल्ला केला तेव्हा सुग्रीवाचा पराजय होऊन तो ऋषमूक पर्वतावर पळाला. या पर्वतावर गेलास तर तुला मृत्यू येईल असा वालीला शाप मिळाला होता. त्यामुळे सुग्रीव त्या पर्वतावर सुरक्षित होता. पण वालीने सुग्रीवाची बायको तारा हिला सुग्रीवापासून हिरावून नेले होते. तारेने वालीचा मृत्यू झाला असे समजून सुग्रीवाशी पुनर्विवाह केला असावा. पुढे सुग्रीवाचे आणि रामाचे सख्य झाले. दोघे समदु:खी होते. दोघांनाही पत्नीचा विरह सहन करावा लागत होता.
रामाने झाडाआडून बाण मारून, वाली सुग्रीव द्वंद युद्ध चालू असताना वालीला ठार मारले. तेव्हा तारा तिथे आली. तिने अनिवार शोक केला. वालीने उदार मनाने तारेला आणि सुग्रीवाला मरता मराता क्षमा केली होती. अखेर तारा आणि सुग्रीवाचे पुनर्मीलन झाले. वालीचा मुलगा अंगद याचा प्रेमाने सांभाळ करण्याचे आपले वचन सुग्रीवाने पाळले. अशी आहे ही तारा राणीची कथा.
पुनर्विवाह रूढ झाल्यानंतरच्या काळात, पती लढाईत मृत्यू पावला असे समजल्यावर, एखाद्या स्त्रीने पुनर्विवाह करावा आणि अखेर तिचा पती युद्धातून सुखरूप परत यावा, असे घडले, तर तिच्या मनाची काय स्थिती होईल, याचे प्रात्यक्षिक वाली, तारा आणि सुग्रीव यांच्या गोष्टीत पाहावयाला सापडते. या प्रसंगात सुग्रीवाने दाखवले तसे सामंजस्य आताच्या काळातील लोक दाखवू शकतील का?