ज्ञान ईश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 6:56 PM
अज्ञानाचा अंधार दूर करायचा तर आत्मज्ञानाचा प्रकाशच जरुरी आहे.
ज्यांचे अज्ञान आत्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला प्रकाशित करते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला प्रकाशीत करते. ज्ञान काय आहे ? आत्मज्ञानं परं ज्ञानम्। आत्मज्ञान हेच परम ज्ञान मानले गेले आहे. अज्ञानाला नेहमी अंधाराची उपमा दिली जाते आणि ज्ञानाला प्रकाशाची. अज्ञानाचा अंधार दूर करायचा तर आत्मज्ञानाचा प्रकाशच जरुरी आहे. आत्मज्ञानाने केवळ अंधारच दूर नाही होत तर आत्मज्ञानच परमला त्या परमात्म्यालाही सूर्याप्रमाणे प्रकाशीत करते असे भगवान म्हणताहेत. भौतिक प्रगती सोबतच आज भौतिक ज्ञानालाच महत्व आले आहे. निश्चित भौतिक ज्ञान हे मानवी जीवनाला फायदेशीर ठरले आहे. परंतु केवळ भौतिक ज्ञान श्रेष्ठ मानत, भौतिक सामुग्री जुटविण्यात व त्याचा उपभोग घेण्यात मनुष्य आत्मज्ञानाचे प्रकाशा अभावी अज्ञानाचे अंधारात विनाशाच्या गर्तेकडेही वाटचाल करीत आहे. आत्मज्ञान परम ईश्वराला प्रकाशीत करते तर भौतिकज्ञान भौतिकालाच प्रकाशीत करते. भौतिकज्ञानाने बाह्य अंधकार मनुष्याने कमी केला असला तरी मनुष्याचे अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार अजून गडद होत आहे. आत्मज्ञानाला प्रकाशाची उपमा यामुळेच दिल्या गेली आहे की, आत्मज्ञानाचे प्रकाशात जीवनात सार्थक काय व निरर्थक काय याची ओळख होते. मनुष्य ज्याला सार्थक ठरवितो ते सार्थक भ्रांतीरुप, स्वप्नरुप तर नाही ? हा विवेक ज्यावेळी प्रकाशीत होतो. ज्ञानाचे उदयाची सुरुवात होते. भ्रांतीचा गडद अंधार हळुहळु दूर होणे सुरु होते. मग वास्तवाचा व सत्याचा उदय होतो. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले निरुपणात हेच समजावितात. जेव्हा अज्ञान पूर्णतः मिटते, तेव्हांच भ्रांतीचा काळोखही नाहीसा होतो. भ्रांती, भ्रम मिटला की, ईश्वर हा सर्व काही करुनही कसा अकर्ता आहे हे प्रगट होते, स्पष्ट होते. दुसरी महत्वाची गोष्ट चित्तात घडून येते की ईश्वर हा जर अकर्ता आहे तर स्वभावतः ईश्वर व मी आदिकाळा पासून एकच आहे तर मीही अकर्ताच ठरतो. असा विवेक जर चित्तात निर्माण झाला तर , त्या मनुष्याला तिन्ही लोकात भेद कुठे आला? त्या स्वानुबोधाने तो मग पाहू लागतो की अवघे जगच मुक्त आहे. ज्या प्रमाणे पूर्व दिशेच्या गाभारी जेव्हां सूर्योदय होऊन प्रकाशाची दिवाळी होते तेव्हां इतर दिशांचाही काळोख मिटून सर्व दिशा प्रकाशमय होतात. मग अशा व्यापक स्वरुपाचे ज्ञान ज्या योग्याला शोधित आले त्याचेत समदृष्टीचा बोध विशेषत्वाने बोलु लागतो.भगवान श्रीकृष्ण व श्री ज्ञानेश्वर माऊलींना श्रध्दापूर्ण नमन !प्रा.रामदास डांगे सरांचे ज्ञानेश्वरीचे प्रतिशुध्दी कार्याला अभिवादन. शं.ना.बेंडे पाटील, अकोला.