सच्च्या भक्तीची आणि भक्तांची परीक्षा घ्यायला जाऊ नका, महागात पडेल; वाचा मार्मिक गोष्ट!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 3, 2022 08:00 AM2022-02-03T08:00:00+5:302022-02-03T08:00:03+5:30
अहंकारापोटी आपण दुसऱ्याची परीक्षा घेतो आणि स्वतःच पेचात पडतो, बादशहाच्या बाबतीतही तसेच झाले!
एक कीर्तनकार महाराज तीर्थाटनाला निघाले. वाटेत एका गावात मुक्कामी थांबले. ईश्वरसेवा म्हणून तेथील मंदिरात कीर्तन करू लागले. गावकऱ्यांना त्यांचे कीर्तन खूप आवडले. महाराजांची कीर्ती पसरू लागली. पंचक्रोशीतून त्यांना कीर्तनासाठी बोलावणे येऊ लागले. त्यांच्या कीर्तनात पांडुरंगाच्या दर्शनाची भाविकांना अनुभूती येत असे.
ही गोष्ट बादशहाच्या कानापर्यंत गेली, तेव्हा त्याने महाराजांना आपल्या राजदरबारात बोलावले आणि विचारले, 'तुम्ही मोठे कीर्तनकार आणि पांडुरंगाचे भक्त अशी तुमची कीर्ती ऐकली. तुमच्याशी देव बोलतो, तुमचे ऐकतो असे लोकांकडून समजले. तुम्हाला मी इथे बोलावले आहे, ते तुमची भक्ती सिद्ध करण्यासाठी. समजा, मी जर एक गाय मारली, तर तुम्ही ती जिवंत केली पाहिजे. नाहीतर ढोंगी बनून तुम्ही माझ्या प्रजेची दिशाभूल केल्याबद्दल मी तुम्हारा ठार मारीन.'
कीर्तनकार महाराज म्हणाले, 'माझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी गायीने आपला जीव का गमवायचा? तुम्ही खुशाल तिच्या जीवावर उदार झालात. तुम्हाला तिच्या जीवाची किंमत नाही. मी परीक्षा द्यायला तयार आहे. परंतु तुम्ही गायीऐवजी तुमच्या जवळच्या कोणा व्यक्तीचा बळी द्यायला तयार असाल तर सांगा.'
बादशहा चक्रावला. महाराजांकडून अशा प्रश्नाची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून महाराज म्हणाले, `तुम्ही तुमच्या राजपूत्राचा बळी देता का? मी माझ्या पांडुरंगाला सांगून त्याला पुन्हा जिवंत करून दाखवतो.'
बादशहा स्वत:च्याच बोलण्यात अडकला. गायीच्या जागी आपल्या स्वत:च्या मुलाचा जीव घेण्याच्या कल्पनेनेही त्याचे हात थरथरू लागले. तो महाराजांना म्हणाला, `तुमच्या भक्तीची परीक्षा घ्यायला मी माझ्या मुलाचा बळी देऊ शकत नाही. मात्र, तुम्ही आता तुमची कीर्तन प्रवचन सेवा थांबवा आणि तुमचा मुक्काम इथून हलवा.'
यावर महाराज म्हणाले, 'बादशहा, तुम्हाला माझ्या भक्तीचा त्रास झाला की तुमच्या विकृत मानसिकतेचा? आपण गायीचा जीव घ्यायला तयार होतात, परंतु मुलाच्या जीवाचा प्रश्न आल्यावर आपण आपला विचार बदललात. याउपर आपण जरी राजपूत्राचा जीव घेण्याची तयारी दर्शवली असती, तरी मी आपल्याला नक्कीच अडवले असते. कारण, कोणाच्याही जीवापेक्षा आमचा पांडुरंग मोठा नाही. नव्हे, तर प्रत्येक जीवात आमचा पांडुरंग आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या भक्तीची परीक्षा बघू नका, तुम्ही म्हणालात तर मी गाव सोडून जाईनही! पण आपण परत कधी अशी कोणाची परीक्षा घेऊ नका एवढी विनंती करतो.'
महाराजांचे बोल ऐकून बादशला वरमला. त्याने महाराजांची क्षमा मागितली. त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, `महाराज, तुमच्या पांडुरंगानेच माझ्या मुलाचे प्राण वाचवले, अन्यथा माझ्या अहंकारापोटी मी त्याचे प्राण घ्यायलाही बधलो नसतो. परंतु, तुम्ही मला भगवंताच्या अस्तित्वाची ओळख करून दिलीत. आजवर गावकऱ्यांकडून ऐकले होते, की तुमच्या कीर्तनात पांडुरंग भेटतो, तो आज मला तुमच्यात दिसला.'
महाराज म्हणाले, 'बादशहा, याचे श्रेय मला नाही, तर संतांना आहे. त्यांनी आमच्यावर घातलेले हे संस्कार आहेत. माऊली म्हणते, `जे खळांची व्यंकटी सांडो' अर्थात, कोणतीही व्यक्ती वाईट नसते, तिच्यातील व्यंकटी अर्थात वाईट वृत्ती बाजूला केली, तर चांगली व्यक्ती शिल्लक राहते. तुम्हीदेखील तुमचे वाईट विचार दूर सारलेत, म्हणून तुम्हाला ईश्वराचे अस्तित्त्व जाणवले. तुमच्याप्रमाणे प्रत्येकाने वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा त्याग केला, तर हे जग किती सुंदर होईल नाही?'