असे म्हणतात, की अंथरूण पाहून पाय पसरावेत. अर्थात आपली जेवढी क्षमता असेल तेवढाच खर्च करावा. ऋण काढून सण साजरे करू नयेत. कर्जबाजारी होऊ नये. कारण बाकी सगळी सोंग आणता येतील पण पैशांचे सोंग आणता येत नाही. म्हणून उसनवारी ठेवू नये. शिवाय दैनंदिन आयुष्यातही छोट्या मोठ्या गोष्टी उधारीवर मागू नयेत. त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. अचानक घडणारे नकारात्मक बदल या छोट्या गोष्टींची उधारीवर घेतल्याचे परिणाम आहेत, हे आपल्याला लक्षातही येत नाही. म्हणून यापुढे सावध राहा.
पेन : आपले लेखन साहित्य कोणाला देऊ नये आणि कोणाचे घेऊदेखील नये. चित्रगुप्त आपल्या कर्मांची नोंद यमाच्या दरबारी लिहीत असतात. त्यासाठी लेखणी हे माध्यम असते. उधारीवर घेतलेली लेखणी हे दुसऱ्यांचे दैन्य, दुःख ओढवून घेण्यास हातभार लावते. म्हणून चुकूनही कोणाचे पेन घेतले असेल तर ते परत करा, स्वतः जवळ ठेवू नका तसेच भेट म्हणून देताना कोरे पेन द्या, वापरलेले पेन नको.
घड्याळ : घड्याळ आपल्याला वेळ दर्शवते. मित्र मैत्रिणींमध्ये एकमेकांचे घड्याळ वापरण्याची आपल्याला सवयही असते. परंतु दुसऱ्याची वापरलेली वस्त्तु त्या व्यक्तीची स्थिती, काळ, भविष्य यांनी प्रभावित होते. म्हणून दुसऱ्यांचे घड्याळ वापरून आपला काळ बिघडू देऊ नये. चांगल्या गोष्टीचा प्रभाव पडला नाही तरी वाईट गोष्टी पटकन प्रभाव पाडतात. म्हणून जे दुसऱ्याचे आहे, ते त्याला देऊन टाका. कोणाचे हरवलेले घड्याळ सापडले तरी वापरू नका. कारण त्या घड्याळाच्या मालकाची वेळ वाईट चालत असेल, तर ती वेळ अकारण तुम्ही ओढवून घ्याल. म्हणून मोह नकोच.
सौंदर्य प्रसाधने : दुसऱ्यांची वापरलेली सौंदर्य प्रसाधने वापरू नयेत. हे आरोग्याच्या आणि शास्त्राच्या दृष्टीने हानीकारक आहे. सौंदर्य प्रसाधने व्यक्तिमत्वाशी निगडित असतात. एखाद्याचे व्यक्तिमत्त्वाचे चांगले गुण संक्रमित होत नाहीत, पण वाईट गुण पटकन संक्रमित होतात. सौंदर्य प्रसाधनांचा देहाशी संपर्क येतो. दुसऱ्याच्या देहाचे दोष संक्रमित होणे टाळायचे असेल, तर दुसऱ्यांच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा.
अंगठी : सुंदर नक्षीदार अलंकार पाहताक्षणी आपल्या मनात घर करतात. ते घालून पाहण्याचा आपल्याला मोह होतो. परंतु काही अलंकार हे ज्याचे त्यानेच वापरायचे असतात. जसे की स्त्रियांची सौभाग्य लेणी, याची परस्परात देवाण घेवाण करू नये. तसेच स्त्री पुरुष दोघांनीही आपली अंगठी अन्य कोणाला वापरण्यास देऊ नये. लग्नाची अंगठी ही नवरा बायकोच्या नात्याला जोडणारा दुवा असते. तर अन्य अंगठ्या ज्योतिष शास्त्रानुसार बनवून घेतलेल्या असतात. त्याचा प्रभाव सर्वांना समान असर देईल असे नाही. त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून अशा गोष्टींच्या वाट्याला न जाणे हेच चांगले.
कपडे : गंमत म्हणून एखाद वेळेस मित्र मैत्रिणींचे किंवा बहीण भावाचे कपडे घालून पाहणे, ही बाब वेगळी. परंतु इतर वेळी कोणाचेही कपडे दीर्घकाळ वापरू नयेत. कपडे आपल्या देहातून निघणाऱ्या लहरी शोषून घेत असतात. या लहरी दुसऱ्यांच्या शरीराला मानवतील असे नाही. म्हणून कोणाचे वापरलेले कपडे वापरू नयेत. गरीब, गरजू व्यक्तींना वापरलेले कपडे देतानाही ते स्वच्छ धुवून मगच द्यावेत. अन्यथा नवीन कपडे दान करावेत. परंतु वापरात असलेले कपडे देऊ नयेत.