फसव्या जगाला भुलू नका, तर वास्तव बघायला शिका; सांगताहेत संत चोखा मेळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:00 AM2021-09-29T08:00:00+5:302021-09-29T08:00:02+5:30

माणसा माणसांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असे जे भेद भासतात, ते वरवरचे असतात. भक्तीला जात नसते, पण चोखटपणाने वागूनही  चोखोबांना उपेक्षा होत होती. ती सल व्यक्त करताना चोखामेळा या अभंगातून व्यक्त करतात.

Don't forget the deceptive world, but learn to see the reality; Saying Sant Chokha Mela! | फसव्या जगाला भुलू नका, तर वास्तव बघायला शिका; सांगताहेत संत चोखा मेळा!

फसव्या जगाला भुलू नका, तर वास्तव बघायला शिका; सांगताहेत संत चोखा मेळा!

googlenewsNext

समाज माध्यमावरील आपला वावर वाढल्यापासून एक आभासी जगत तयार झाले आहे. तिथे प्रत्येक व्यक्ती केवळ आनंदात आहे असे वाटते किंवा भासवते. दुसऱ्याला पाहून आपण आपली परिस्थिती ताडून पाहतो आणि अपेक्षाभंग होताच दु:खी होतो. वरवर छान दिसणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगात डोकावून पाहिले असता, वेगळीच परिस्थिती नजरेस पडते. मग, केवळ चकचकीत आवेष्टनावर विश्वास ठेवायचा, की सत्यपरिस्थितीदेखील डोळसपणे पाहायची, हे आपण ठरवायचे. सुंदर आवेष्टनाअभावी आज अनेक आयुष्य धुळीत पडलेली आहेत. त्यांचे महत्त्व जाणून घेत, त्यांना कोंदण मिळवून देणे, ही आपली जबाबदारी आहे. यासाठी संत चोखामेळा, यांनी मांडलेल्या विचारांचा आढावा घेऊया.

चोखामेळा हे ज्ञानदेवकालीन संत मूळचे मंगळवेढ्याचे. पण त्यांचे वास्तव्य बराच काळ पंढरपूरला होते. संत नामदेवांनी त्यांना मंत्रोपदेश दिला होता. त्यांच्या घरची सगळी मंडळी विठ्ठलभक्तीत एकरूप झाली होती. त्यांची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मुलगा कर्ममेळा, मेहुणा बंका व स्वत: चोखामेळा या सर्वांची अभंगरचना उपलब्ध आहे. मंगळवेढ्यास गावकूस बांधण्यासाठी अधिकाऱ्यांनी बहुजनांना वेठीला धरले. बांधकाम चालू असताना कूस कोसळले. इतर बांधवांबरोबर चोखोबांचेही निर्वाण झाले. त्यांच्या अस्थी तिथुन आणून नामदेवांनी पंढरीस महाद्वारासमोर चोखोबांची समाधी बांधली. 

माणसा माणसांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असे जे भेद भासतात, ते वरवरचे असतात. भक्तीला जात नसते, पण चोखटपणाने वागूनही  चोखोबांना उपेक्षा होत होती. ती सल व्यक्त करताना चोखामेळा म्हणतात, 

ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।
कमान डोंगी परी, तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।
नदी डोंगी परी, जल नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा।
चोखा डोंगा परी, भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा।

ऊस वेडावाकडा वाढला असेल. त्याची सगळी कांडं सरळ, एका रेषेत नसतीलही, पण त्याचा रस मात्र त्याच्यासारखाच डोंगा म्हणजे वाकडा नसतो. उसाचा रस गोडच असतो. त्यामुळे उसाच्या बाहेरील रंगाला विंâवा आकाराला महत्त्व नाही. धनुष्याची कमान वाकडी असली, तरी त्याला लावलेला बाण वाकडा नसतो. तो अगदी सरळ असतो. मग कमानीला नाव ठेवून काय उपयोग? नदीला वळण नसते. तिचा प्रवाह वाकड्या रेषेत जात असतो. परंतु, नदीचे पाणी स्वच्छ व मधुर असते. नदीचे वळण आणि पाण्याची गोडी यांचा परस्परसंबंध नसतो. चोखोबांना तुम्ही एक वेळ कमी समजालही, परंतु त्यांची भक्ती श्रेष्ठ आहे. तो भाव अस्सल आहे. 

गावगाड्यात आणि शहरात आजही स्पृश्याअस्पृश्यता पाळली जाते. गावकुसाबाहेर बहुजनांची वस्ती असते. चोखामेळा त्या समाजाचे शल्य मांडतात. त्यांच्या नावातील योगायोग पहा- चोख म्हणजे स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि मेळा म्हणजे मलीन. या दोन्ही गोष्टी एका नावातच नाही, तर एका देहातही एकवटल्या आहेत. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, या शब्दातील वेदना, आर्त भाव आणि सच्ची ईश्वरभक्ती प्रगट होते. चोख-निर्मळ असूनही जातीव्यवस्थेत भरडल्या गेलेल्या संत चोखामेळ्यांचे आयुष्य लौकीकार्थाने उपेक्षित राहीले, परंतु पारमार्थिक अर्थाने, त्यांनी भगवंताला केव्हाच आपलेसे करून घेतले. भक्तीनिष्ठेच्या बळावर चोखोबांनी जशी आयुष्याची उंची वाढवत नेली, तशी आपणही आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर स्वत:चे नाव, ओळख कमावू शकतो. त्यासाठी फक्त स्वत:चा आत्मविश्वास ठाम असायला हवा.

Web Title: Don't forget the deceptive world, but learn to see the reality; Saying Sant Chokha Mela!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.