जपानमध्ये एक मुलगा होता. त्याचे नाव होते तोकयो. त्याला जन्मत: एक हात नव्हता. परंतु बालपणापासून कराटे शिकण्याची त्याची खूप ईच्छा होती. एक हात नसताना, एवढी अवघड कला तो कसा काय शिकू शकेल, याची त्याच्या आई वडिलांना शंका होती. कराटे शिकायला नेले, तर तिथे गेल्यावर त्याला आपल्या दिव्यांगत्वाची जाणीव होऊन नैराश्य येऊ नये, अशी त्यांची काळजी होती.
तोकयोने हट्ट सोडला नाही. अनेक ठिकाणी त्याला प्रवेश नाकारण्यात आला. जपानमधल्या एका प्रख्यात कराटे क्लासमध्ये तोकयोला त्याच्या आई वडिलांनी नेले. तिथल्या मुख्य शिक्षकांना ते भेटले. त्यांनीदेखील तोकयोला पाहून कराटे शिकवण्यास नकार दिला.
छोटासा तोकयो रागाने म्हणाला, तुम्ही मला तुमच्या पद्धतीने शिकवा, मी माझ्या पद्धतीने शिकतो. पण नाही म्हणू नका. बाकी सर्वांनी नाकारले आहे, पण आता तुम्ही नाकारू नका. कराटे शिकणे, हे माझे स्वप्न आहे आणि मला ते सत्यात उतरवायचे आहे.
तोकयोची जिद्द पाहून शिक्षकांनी त्याला प्रवेश दिला. कराटे करताना हाताचा सर्वाधिक वापर होत असल्याने त्यांनी इतर मुलांना वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या. परंतु तोकयोची गाडी पायाने किक मारण्यावरून पुढे सरकत नव्हती. जवळपास सहा महिने होत आले. तोकयो किक मारण्याचा सराव करत राहिला. एक दिवस त्याने शिक्षकांना विचारले, 'बाकीच्यांना शिकवता ते मला का शिकवत नाही?' त्यावर शिक्षक म्हणाले, `जेवढे सांगितले तेवढे कर, नसेल शिकायचे तर तू जाऊ शकतोस!'
तोकयो दुखावला गेला. परंतु त्याने जिद्द सोडली नाही. वार्षिक परीक्षेची वेळ आली. तोकयोचा प्रतिस्पर्धी चांगलाच बलवान होता.वेळ सुरू झाली. प्रतिस्पर्धी कराटे करत होता. तोकयो प्रतिवार करत होता. प्रतिस्पर्धी जिंकण्याच्या टप्प्यावर असताना तोकयोला कमकुवत समजून तो गाफिल राहिला आणि त्याच क्षणाचा फायदा घेऊन तोकयोने जोरदार किक मारली आणि प्रतिस्पध्र्याला आडवा केला. तोकयो आनंदून गेला. त्याच्या शिक्षकांना आणि आईवडिलांनाही आनंद झाला. सगळ्या वर्गाने तोकयोच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक केले आणि तोच तोकयो भविष्यात उत्तम कराटे करू लागला.
तोकयोप्रमाणे आपणही आपल्या स्वप्नांप्रती आत्मविश्वास दाखवला तर मार्गात येणाऱ्या अडचणी किरकोळ वाटू लागतील. म्हणून ध्येय गाठत असताना, मार्गात अडचणी आल्यास डगमगून जाऊ नका, लक्ष ध्येयावर केंद्रित करा, मार्ग आपोआप सापडत जाईल.