दोन वेळा जेवायचे की दर दोन तासांनी? बघा आयुर्वेद काय सांगते!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 25, 2021 02:43 PM2021-01-25T14:43:10+5:302021-01-25T14:44:05+5:30
आयुर्वेदाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगावर इलाज करत नाही, तर रोगाचे समूळ उच्चाटन करते किंवा रोग होऊच नये म्हणून तजवीज करते. त्यामुळे आहाराबाबत एकतर वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा आयुर्वेदाने दिलेल्या नियमांचे पालन करावे
अलीकडच्या काळात आपण सगळेच आरोग्याप्रती सजग झालो आहोत. एवढेच काय, तर आपण काय खातो, किती खातो, कसे खातो यावर लक्ष ठेवणारे मोबाईल अॅप आपल्यावर नियंत्रण ठेवतात, दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सूचना देतात. जेवणात किती कर्बोदके, प्रथिने असली पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन करतात. एकूणच आपला आहार मोजून मापून होऊ पाहत आहे. हे कमी म्हणून की काय, आपल्यावर सतत डाएट फूडच्या व्हिडिओचा समाज माध्यमांतून मारा होत असतो. अशाने आहारशास्त्राबाबत आपण सावध होत आहोत की गोंधळत आहोत, अशी अवस्था निर्माण होते. याबाबत प्राचीन शास्त्र म्हणून ओळखले जाणारे आयुर्वेद काय म्हणते, ते सुभाषितातून समजावून घेऊ.
भोजनं हीनमात्रं तु न बलोपचयौजसे
सर्वेषां वातरोगाणां हेतुतां च प्रपद्यते
अतिमात्रं पुन: सर्वानाशु दोषान प्रकोपयेत्
वाग्भट संहितेत हे सुभाषित दिले आहे. उचित प्रमाणाहून कमी अन्न खाल्ले असता बल, पुष्टी व तेज उत्पन्न होत नाही व असे वागणे वातव्याधीस कारणीभूत होते. अति प्रमाणात घेतलेल्या आहाराने तर सर्वच दोषांचा प्रकोप होतो.
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटले आहे, `अन्नाद् भवन्ति भूतानि' म्हणजे अन्नापासूनच सर्व प्राणिमात्र उत्पन्न होतात व अन्नावरच त्यांचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे योग्य अन्नाचे योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात उपास करून स्वत:ची उपासमार करणे वा डाएटिंगच्या नावाखाली शरीराला क्लेश देणे हे आयुर्वेदाला संमत नाही. त्याने त्रासच होतो. पण त्याचबरोबर अति प्रमाणात घेतलेला आहारही अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण करणारा ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीनुसार या दोन्हीतला सुवर्णमध्य शोधणे आवश्यक असते.
अन्नेन पूरयेदर्धं तोयेन तु तुतीयकम्
उदरस्य तुरीयांशं संरक्षेद्वायुचारणे
पोटाचे चार भाग कल्पून त्यातील दोन भाग अन्नाने भरावेत. एक भाग पाण्याने भरावा व उरलेला चौथा भाग वायूंच्या संरक्षणासाठी मोकळा सोडावा. मात्र अल्पाहार किंवा उपोषण म्हणजे मिताहार नाही, हे लक्षात ठेवावे.
आयुर्वेदाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रोगावर इलाज करत नाही, तर रोगाचे समूळ उच्चाटन करते किंवा रोग होऊच नये म्हणून तजवीज करते. त्यामुळे आहाराबाबत एकतर वैद्यकीय सल्ला घ्यावा किंवा आयुर्वेदाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि ऐकीव माहितीनुसार शरीरावर कोणतेही प्रयोग करू नये, हे इष्ट!