एकादशीच्या दिवशी मुख्यत्त्वे 'तांदूळ' न खाण्यामागचे नेमके कारण काय, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:12 PM2021-09-16T16:12:20+5:302021-09-16T16:12:48+5:30
अनेक जण उपास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात. त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते.
एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो, पारमार्थिक ओढ लागते, संसार सुखाचा होतो. निरोगी काया, सुदृढ आरोग्य आणि धन संपत्तीचा लाभ होतो. ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे. म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात. त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णुंचा आशीर्वाद प्राप्त होतो.
एकादशी ही तिथी पौर्णिमेआधी चार दिवस आणि अमावस्येआधी चार दिवस. या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात. आपल्या शरीराचा ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल, तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते. यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपास सांगितला आहे.
भाद्रपद शुक्ल एकादशी : भगवान विष्णूंचा कूस बदलण्याचा दिवस; सविस्तर वाचा!
आयुर्वेदात उपासाच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात. लंघन अर्थात अन्न व्यर्ज्य करणे. आपला देह हे एक यंत्र आहे. यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते, अन्यथा ते कधीही बंद पडते. शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. यंत्र सतत वापरात असेल, तरीही ते काम करणे बंद करते. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते. शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते.
आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही, तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रीया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपास करावा. उपास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागली, तर फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल, तर एकादशीचा उपास न केलेला बरा.
अशावेळेस अनेक जण उपास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात. त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते. त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती अशी -
पौराणिक कथेनुसार महर्षि मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. यानंतर, त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भात पडला. असे मानले जाते की, ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते, त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते.
मनुष्यात आणि निसर्गात परिवर्तन घडवणारी परिवर्तिनी एकादशी!
तर तांदूळ वर्ज्य करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे -
वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते. म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे.
सरतेशेवटी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, ते म्हणजे ही पथ्ये आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत. त्याचे पालन करायचे असेल तर ते शास्त्राला धरून केले तरच त्याचा उपयोग होईल. जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल!