देवघरात नेमके कोणते आणि किती देव ठेवावेत, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 08:00 AM2021-03-26T08:00:00+5:302021-03-26T02:30:02+5:30
देवघरात ठेवलेल्या मूर्तीची किंवा तसबिरीची आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही. म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे.
हिंदू दैवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले, तरी देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी, असे शास्त्र सांगते. पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात व नंतर पूजेत ठेवतात. यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली, तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते, की त्या सर्वांची रोज पूजा करणेही कठीण होऊन जाते. हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये.
देवघरात ठेवलेल्या मूर्तीची किंवा तसबिरीची आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही. म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे. देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत. ते देव कोणते ते जाणून घेऊया.
प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते. सून आल्यावर तिच्या माहेरचीही अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात विसावते. त्यांचे स्थान अढळ आहे. याशिवाय कुलदेवतांचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्ट देवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची तसबीर वा मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी. याउपर मूर्तींची किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये.