Ganesh Festival 2021 : बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता; वाचा ही गणेश पुराणातील गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:43 PM2021-09-15T19:43:42+5:302021-09-15T19:44:53+5:30

Ganesh Festival 2021 : या प्रसंगातून भगवंताने स्त्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून, त्यांच्या अंगभूत शक्तीला आवाहन केले आहे.

Ganesh Festival 2021: Bappa is a supporter of women empowerment; Read this story from Ganesh Purana! | Ganesh Festival 2021 : बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता; वाचा ही गणेश पुराणातील गोष्ट!

Ganesh Festival 2021 : बाप्पा हा तर स्त्री सबलीकरणाचा पुरस्कर्ता; वाचा ही गणेश पुराणातील गोष्ट!

Next

स्त्री हे मुळात आदिशक्तीचे रूप आहे. ती प्रसंगी दूर्गा बनते, तर कधी गौरी. स्वसंरक्षणार्थ ती दुसऱ्यांवर विसंबून असते, हा समस्त मानवजातीचा गैरसमज आहे. ती लढवय्यी आहेच, फक्त काळानुकाळ पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीला तिच्या आत्मभानाची ओळख करून देणारा श्रीगणेशासारखा धुरंदर सोबत हवा! गणेपुराणातील एक कथा, महिलांच्या पहिल्या वहिल्या सैन्यतुकडीची माहिती करून देते. अर्थात, त्या तुकडीचा नायक होता, गणाधिपती गणनायक!

माघ गणेश जन्माच्या वेळी ही कथा आपण अनेकदा ऐकली असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण या कथेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू.

देवांतक आणि नरांतक नावाचे राक्षस, यांनी अनेक वर्षे तपश्चर्या करून देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून घेतले. दिवसा किंवा रात्री, देव, दानव किंवा मानव यांच्याकडून आपला वध होणार नाही, असा वर मागून घेतला. भोळ्या महादेवांनी तथास्तू म्हटले. उन्मत्त झालेल्या दोन्ही भावंडांनी जगाला त्राहिमाम करून सोडले. स्वर्ग, मृत्यू, पाताळी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या फौजेसह चाल करून गेले. सगळे देव गणेशाला शरण आले. गणेशाने त्यांना अभय दिले आणि महोत्कट या नावाने ते असूरांशी युद्धाला सामोरे गेले.

कित्येक महिने हे युद्ध सुरू होते. दोघे भाऊ दोन्ही बाजूंनी घनघोर युद्ध करत होते. त्यांना युद्धात अडकवून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करण्यास सांगितली. महिला आपल्याशी लढा देतील, हा विचारही मनात न आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता. त्यांना स्त्रिशक्ती कळावी, म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुमके तयार करायला सांगितले. आपण युद्धाचे नेतृत्व केले आणि रिद्धी-सिद्धीसह समस्त महिला सैन्याच्या तुकडीबरोबर देवांतक आणि नरांतकाचा दारुण परावभव केला. 

या प्रसंगातून भगवंताने स्त्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून, त्यांच्या अंगभूत शक्तीला आवाहन केले आहे. 'दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' या समर्थवचनाप्रमाणे, आपल्या अब्रुरक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल, हा विचार सोडून द्या. युद्धकलेत निपुण व्हा. दरदिवशी अनेक प्रकारचे असूर भेटणार आहेत. तुमच्या नजरेतून त्यांना जरब बसायला हवी. तरीही त्यांनी हल्ला केला, तर त्यांच्याशी प्रतिकार करण्याची तुमची तयारी हवी. हाती असलेले पोळपाट लाटणे, प्रसंगी ढाल-तलवारीसारखे फिरवून स्वत:चा बचाव करता आला पाहिजे. 

जे हात सुग्रास मोदक बनवतात, कळीदार पाकळ्या काढतात, साजूक तूप घालून नैवेद्य दाखवतात, तेच हात जेव्हा स्वसंरक्षणार्थ उठतील, त्यादिवशी महानैवेद्य महागणपतीला पोहोचेल. कारण, तोच या महिला तुकडीचा निर्माता आहे.

Web Title: Ganesh Festival 2021: Bappa is a supporter of women empowerment; Read this story from Ganesh Purana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.