Ganesh Festival 2021 : गणोबा सांगतात, 'आई वडील हे आपले जग आहे, त्यांना ज्याने जिंकलं त्याने जगाला जिंकलं!'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:15 PM2021-09-14T17:15:20+5:302021-09-14T17:16:20+5:30
Ganesh Festival 2021 : प्रत्येक वेळी शक्तीचा उपयोग करून चालत नाही, तर युक्तीनेही काही कामे पार पाडावी लागतात.
धाकटी मुलं मुळातच हुशार असतात. थांबा थांबा, हे वाचून मोठ्यांनी वाईट वाटून घेऊ नका. कारण, मोठी मुलं जास्त मेहनती असतात. आता आपला लाडका बाप्पा आणि त्याचा मोठा भाऊ कार्तिकेयच बघा ना!
एके दिवशी सकाळी दोघे जण खेळत बसले होते. आता कोणता नवीन खेळ खेळायचा, याचा ते विचार करू लागले. दोघांना काही सुचेना. मग त्यांनी आईकडे 'खेळ सुचव' म्हणत तगादा लावला. आईला आपली कामे उरकायची होती. बाबा त्यांच्या कामात होते. अशा वेळी दोन्ही मुलांना जास्त वेळ खेळात अडकवून ठेवण्यासाठी आईने दोघांमध्ये स्पर्धा लावली. 'दोघांपैकी जो पहिले पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करेल, तो विजयी.'
दोघांनी उत्साहाने माना डोलावल्या. पार्वती मातेने स्पर्धेचा झेंडा उंचावला आणि शर्यतीला सुरुवात करून दिली. कार्तिकेय स्वामींचा मोर तयारीतच होता. त्याच्यावर स्वार होऊन कार्तिकेय स्वामी पृथ्वीप्रदक्षिणेला निघाले. उंदिरराव गणाधिपतींच्या सूचनेची वाट बघत हात जोडून सेवेत बसले होते. मात्र, गणोबाच्या चेहऱ्यावर शर्यत जिंकण्यासाठी कुठलीच घाईगर्दी दिसत नव्हती. उलट, कार्तिकेय दादा बाहेर गेल्यावर ते मोदकपात्र घेऊन एकटे सेवन करायला बसले. पार्वती मातेला हसू आले. तिने विचारलेही, 'गणू, स्पर्धेत हरायचे आहे का?'
'नाही गं आई, स्पर्धा तर मीच जिंकणार, तू नको काळजी करूस. तुझी कामं आवरून घे, मी निवांत मोदक खात बसतो.'
पार्वती माता, तिच्या कामाला निघून गेली. कार्तिकेय स्वामींची अर्धी पृथ्वी पालथी घालून झाली. गणोबाने सॅटेलाईटच्या मदतीने कार्तिकेय स्वामींचे लोकेशन ट्रॅक केले.
एव्हाना पार्वती माता आणि देवाधिदेव महादेव आपली कामे उरकून कैलासावर गप्पा मारत बसले होते. दुपारचे भोजन घेण्यासाठी कार्तिकेयाच्या येण्याची वाट बघत होते. गणोबाने पुन्हा एकदा कार्तिकेय दादा कुठवर आलेत, हे तपासून पाहिले. स्पर्धेच्या अटीनुसार पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून ते आनंदाच्या भरात कैलासावर येताना दिसले.
बाप्पाने लगेच उठून बाप्पाने आई-बाबा बसलेल्या आसनाभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्यांना नमस्कार केला. आपल्याआधी गणोबाला कैलासावर आलेले पाहून कार्तिकेय स्वामी गोंधळले. आपण हरलो, या विचाराने नाराज झाले. तरीदेखील स्पर्धेचा निकाल जाणून घेण्यासाठी त्यांनी मातेकडे विचारणा केली. पार्वती मातेने, महादेवांना निकाल जाहीर करण्यास सांगितले. कैलासावर उपस्थित नंदी महाराज आणि शिवगणदेखील निकाल ऐकण्यास उत्सुक होते. दोन्ही स्पर्धकांकडे आलटून पालटून पाहत, महादेवांनी निकाल जाहीर केला आणि विजेता आहे....बालगणेश!!!
निकाल ऐकून कार्तिकेय स्वामी हिरमुसले, परंतु पुढल्याच क्षणी त्यांनी तावातावाने 'असं कसं, असं कसं' म्हणत विचारणा केली. गणोबाच्या निकालावर शंका उपस्थित केली. आपण किती परिश्रमाने स्पर्धा पूर्ण केली, याचाही हिशोब मांडला. त्यावर शांतपणे उत्तर देत गणोबा म्हणाले,
'दादा, स्पर्धेच्या नियमाप्रमाणे तू पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केलीस. पण त्यासाठी फार श्रम घेतलेस. प्रत्येक वेळी शक्तीचा उपयोग करून चालत नाही, तर युक्तीनेही काही कामे पार पाडावी लागतात. तू पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून येत असल्याचे पाहून मी आपल्या आई-बाबांना प्रदक्षिणा मारली. कारण, आपल्या पालकांमध्ये आपले विश्व सामावले आहे. शिवाय पृथ्वी म्हणजे शक्ती आणि आई ही शक्तीस्वरूप असते. मग तिला प्रदक्षिणा मारली काय किंवा खऱ्याखुऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारली काय, एकच!'
गणोबाची हुशारी बघून कार्तिकेय स्वामींना हसू आले आणि त्यांनीही आई-वडिलांबरोबर गणोबाला प्रथम येण्याचा मान अर्पण केला.
म्हणून समर्थ रामदास स्वामींनीदेखील, मनाचे श्लोक लिहित असताना सर्वप्रथम 'मनाला' बाप्पाच्या हुशारीचा बोध दिला. तोच बोध घेऊन आपणही दिवसाची मंगलमय सुरुवात करूया आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे ध्यानात ठेवून आपल्या आयुष्यातील स्पर्धा जिंकूया. बाप्पा मोरया...!
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा।।