महिमा धर्मनाथ बीजचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 09:00 PM2021-02-10T21:00:34+5:302021-02-10T21:00:45+5:30

जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत.

Glory to Dharmanath Beej | महिमा धर्मनाथ बीजचा

महिमा धर्मनाथ बीजचा

googlenewsNext

माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मनाथबीज असें म्हणतात  या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी "धर्मनाथबीजेचा" उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्तिनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.

राजा त्रिविक्रमाच्या मृत्युपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरू योगी मच्छिंद्रनाथ ह्यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर १२ वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरुपी पुत्राची पाप्त्री झाली ज्यांचे नाव "धर्मनाथ" ठेवण्यात आले.
१२ वर्षांचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिन्द्रनाथानी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळरुपात आले, परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच. तिने आपल्या पुत्राला, धर्मनाथ ह्यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करवून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ ह्यांनी आशीर्वाद दिला की १२ वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ ह्याचे कडून धर्मनाथ ह्यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल.
१२ वर्षांनी "माघ शुद्ध द्वितीया" ह्या दिवशी गोरक्षनाथ ह्यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमुल्य झाला होता कि गोरक्षनाथ ह्यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की, जो कुणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दान धर्म, पुण्य कर्म करील, त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख, शांती, धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील.
हा सोहळा "धर्मनाथ बीज" ह्या उत्सवाने ओळखला जातो.

धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा

आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्याठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पुजन करावे. हार-पुष्प अर्पण करावे. धुप-दिप दाखवावा. व श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथातील ३४ वा अध्याय पठण करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवुन नाथांची आरती करावी  व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरबऱ्याच्या घुगऱ्या , मलिदा, वडे, ई. नैवेद्यही अर्पण करु शकता.

- ज्योती शेगोकार
बावनबीर जि. बुलढाणा

Web Title: Glory to Dharmanath Beej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.