आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन!- ओशो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 05:32 PM2021-01-20T17:32:24+5:302021-01-20T17:34:00+5:30

आनंद एक अनुभूती आहे. पण आमच्या मनाची सवय तर दु:खाला कवटाळण्याची आहे. तक्रार, निंदा, विरोध या आपल्या मनाच्या सवयी असतात. या सवयींच्या जंजाळातून बाहेर पडला, तर तिथे तत्क्षणी आनंदाचे घटित घडेल.

Happiness is expansion and sorrow is contraction! - Osho | आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन!- ओशो 

आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन!- ओशो 

googlenewsNext

वैराग्याचे एक फार बेगडी रूप प्रचलित आहे. हे रूप आहे, निषेधात्मक, नकारात्मक, जीवनविरोधी, उत्सवविरोधी! ते शिकवतं संकोच! विस्तार होणं त्याला ठाऊकच नसतं. मी तुम्हाला विस्तार करायला शिकवतो. हे असं विस्तृत होत जाणं (सर्व चराचराला आपल्या कवेत येणं, त्याच्याशी एकरूपतेची जाणीव होणं) हाच ब्रह्माच्या निकट जाण्याचा उपाय आहे. विस्तार हा शब्द ब्रह्माचंच रूप आहे. ब्रह्मचा अर्थ आहे विस्तीर्ण होत जाणारं. त्या विस्ताराला अंतच नसतो. ते पसरतच जातं. 

आनंद म्हणजे विस्तार आणि दु:ख म्हणजे आकुंचन! तुम्हाला अनुभव आला असेल, जेव्हा तुम्ही दु:खी असता, तेव्हा आक्रसलेले असता. त्या अवस्थेत दारं खिडक्या बंद करून एका कोपऱ्यात पडून राहता. तुम्हाला वाटतं कुणाला भेटू नये, कुणाशी बाीलू नये, कोणी आपल्याला बघू नये, कुणी दिसू नये. आत्यंतिक दु:खाच्या अवस्थेत माणूस आत्महत्यासुद्धा करतो. स्वत:ला चरम अवस्थेपर्यंत आक्रसून घेण्याचा तो शेवटचा उपाय आहे. तो इतका आक्रसून घेतो, की पुन्हा सूर्याचा झळकता प्रकाश बगू नये, लोकांचे चेहरे बघावे लागू नयेत की उमलणारी  फुलं नजरेस पडू नयेत. आपल्यासाठी गुलाब उमललाच नाही, आपल्यासाठी सूर्य उगवलाच नाही, आपले प्राण जागे झाले नाहीत, तर आता जग जागं असेल, तर त्याच्याशी आमचा काय संबंध?

आत्महत्या हा स्वत:ला आक्रसण्याचा परम सीमेचा उपाय आहे. त्याहून अधिक आक्रसता येत नाही. दु:ख आत्मघाती असतं आणि आनंद हा आत्म्याचा विस्तार असतो. आत्मा इतका मोठा होत जातो, की चंद्रसूर्यसुद्धा त्यात सामावतात. विराट रूपाबरोबर आनंद एकरूप होतो. मग हा आनंद देहाच्या छोट्याशा कुडीत कसा बरं मावणार? तो उसळतो, अभिव्यक्त होतो. हजारो रागांचे सूर वाजवतो. हजार रंगांच सहस्रधारांची कारंजी उसळतात. हाच उत्सव असतो. आनंद म्हणजे आत्मानुभव. उत्सव म्हणजे परमात्म्याबद्दल व्यक्त होणारी कृतज्ञता. 

दूर कोकिळेचं कुंजन ऐकत आहात. अशीच एक कोकीळा तुमच्या प्राणांमध्ये लपली आहे. तुमच्या अंतरात्म्यात एक चातक साद घालतो आहे. माझी प्रियतमा कुठे आहे? पण तुमच्या डोक्यात इतका प्रचंड कोलाहल माजला आहे की तुम्हाला कोकिळा किंवा चातक कुणाचेच सूर ऐकू येत नाहीत. त्या कोलाहलात तुम्हाला ज्या गोष्टींचा आधार मिळेल, तो टिपून घेतला जातो.

आनंद एक अनुभूती आहे. पण आमच्या मनाची सवय तर दु:खाला कवटाळण्याची आहे. तक्रार, निंदा, विरोध या आपल्या मनाच्या सवयी असतात. या सवयींच्या जंजाळातून बाहेर पडला, तर तिथे तत्क्षणी आनंदाचे घटित घडेल. कारण सारे अस्तित्त्व आनंदाने काठोकाठ भरलेले आहे. फक्त तुम्ही त्याला आपल्या आत प्रवेश करू देत नाही. तुमची दारं खिडक्या तुम्ही घट्ट बंद करून घेतली आहेत. ही कवाडं उघडा, मग तुमची सारी इंद्रिय म्हणजे आनंदाची द्वारं ठरतील. तुमचा देह आनंद झेलून घेण्यासाठी समर्थ होईल. तुमचं मन आनंदाचा अंगीकार करण्यासाठी पात्र होईल. शांत होईल. तुमचा प्राण आनंदित होण्यायोग्य विस्तारेल. त्यानंतर जे घडेल, तो उत्सव असेल. मग तुम्हीसुद्धा चंद्रचांदण्यांबरोबर, फुलांसह, वृक्षांसंग, हवेच्या झुळकेबरोबर नाचू शकाल. उत्सव ही आनंदाची अभिव्यक्ती असते. उठा. जागे व्हा. आनंद बरसतो आहे. तो तुमचा स्वभाव आहे. तुम्ही झोपले आहात. तुम्हाला आनंद शोधायला नको. केवळ जागृत व्हा. निजरूप ओळखा. तत्क्षणी अखंड वर्षा व्हावी, तसा आनंदाचा वर्षाव होईल.
 

Web Title: Happiness is expansion and sorrow is contraction! - Osho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.