आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:05 PM2020-07-03T17:05:34+5:302020-07-03T17:05:54+5:30

   अनादि काळापासून श्री गुरु महात्म्य शास्त्रांनी वर्णन केले आहे. आषाढी पौर्णिमा हे श्री गुरु पूजनाचे पावन पर्व. आषाढी ...

Holy festival of Shri Gurupujana on Ashadi Pournima! | आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व!

आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व!

Next

   अनादि काळापासून श्री गुरु महात्म्य शास्त्रांनी वर्णन केले आहे. आषाढी पौर्णिमा हे श्री गुरु पूजनाचे पावन पर्व. आषाढी पौर्णिमेला व्यास  पौर्णिमा, गुरु पौर्णिमा म्हणतात. श्री व्यासोनारायण ज्ञान अवतार आहेत. जगाच्या उध्दारासाठी अदभूत असे ज्ञान त्यांनी प्रकट केले आहे. वेदांचे विषय वार विभाजन त्यांनी केले म्हणून त्यांना महर्षी वेदव्यास हे नामनिधान प्राप्त झाले. जगामधे वेद ज्ञान त्यांनी मुखर केले. 
    वेद, उपनिषद, पुराणे, श्रुति, स्मृति, ब्रह्मसूत्र, महाभारत इत्यादि ग्रंथ सर्व जीवांच्या उद्धारासाठी प्रकट केले. माउली ज्ञानेश्वर महाराजांनी व्यासोनारायण भगवानचा मधुर शब्दात गौरव केला.

म्हणोनी महाभारती जे नाही l
ते नोहेचि लोकी तिहीं l
येणे कारणे म्हणिपे पाही l
व्यासोच्छिष्ट जगत्रय ll
तैसे श्री गुरुचे महिमान l
आकळीते कै असे साधन l 
हे जाणोनियां मिया नमन
निवांत केले ll

    श्री गुरुकृपा झाली की निश्चित परमात्म कृपा होते. म्हणोनि मनुष्याने पूर्ण श्रद्धा समर्पित भावाने श्री गुरूला शरण जावे. श्री गुरुचे महिमान कसे करावे. गुरुतत्व अगम्य आहे. त्या तत्वाचे आकलन व्हावे यासाठी श्री गुरु शरणागती शिवाय दुसरे साधन नाही.
    गगनावरी घडे रिचवून अभिषेक कसा करता येईल? अमृताचे रांधन कसे करता येईल? चंदनाला सुगंधाने चर्चित कसे करता येईल? हे सर्व जसे अशक्य तसेच श्री गुरु महात्म्य वर्णन करणेही शक्य नाही. भरतखंडातील सर्व संतानी श्री गुरु महात्म्याचा उद्घोष केला आहे. श्री गुरु गीता ग्रंथात स्वयम श्री शिव भगवान पार्वती मातेला गुरु तत्वाचा उपदेश करतात. 
गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा l
गुरुरेव परब्रह्म  तस्मै श्री गुरुवे नमः ll
सर्वदेवमय श्री गुरु l
त्याहुनी असती थोरु l
अफाट ज्ञान सागरू l
अगम्य ll

---
    व्यासाय विष्णुरुपाय व्यासरुपाय विष्णवे l
    नमो ब्रम्हविधये वाशिष्ठाय नमो नम: ll
वशिष्ठ ऋषींच्या चवथ्या पिढीमध्ये व्यासदेवांनी अवतार धारण केला. श्रीगुरू नारद महर्षिच्या आज्ञे अनुसार ब्रम्हनदी सरस्वतीच्या किनारी बदरीवनात शम्याप्रास या ठिकानी घोर तपाचरण केले , त्यांचे अंतकरणी विश्वाचे आर्त प्रकाशित झाले. त्यांची ब्रहमवादिनी वाणी शास्त्रांचा उच्चार करू लागली. त्यांच्या तपपूत  वाणीने ज्ञानदीप प्रज्वालित झाला. त्यांच्या तप प्रकाशात मायेने आपली सर्व शस्त्रे बाजूला ठेऊन साष्टांग दंडवत केला.
 ब्रम्ह देवाने जय जयकार केला “ धन्य धन्य व्यासोनारायणा l 
त्रिवार वंदन तुमचे चरणा l जगध्दोरा कारणा l अवतार केला l”
मानवजातिचंच नव्हे तर कृमि कीटकांपासून देवादि पर्यंत उद्धाराचा मार्ग दाविला ll 
         नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे
         फुल्लारविन्दायत पत्रनेत्र l
        येन त्वया भारत तैलपूर्ण 
        प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप: ll
न भूतो न भविष्यति असे महत कार्य महाप्राज्ञ व्यासोनारायणांनी सम्पन्न केले. अनेक भक्त उच्च पदाला गेले . तेच व्यासदेव श्रीगुरू म्हणून पूजिले जातात. श्रीगुरुची कृपा झाली कि जीवाचे परम कल्याण होते. 
        मुकं करोति वाचालं
        पंगुम लंघयते गिरिम् ।
        यत्कृपा तमहं वंदे 
        परमानंद माधवंम ll
माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुतत्वाचा  जयघोष केला
        गुरु हा सुखाचा सागर l
        गुरु हा प्रेमाचा आगर ll
        गुरु हा धैर्याचा डोंगर l
        कदाकाळी डळमळीना ll
        गुरु वैराग्याचे मूळ l
        गुरु हा परब्रहम केवळ ll
        गुरु सोडावी तात्काळ l
        गाठ लिंग देहाची ll
    महत भाग्य आपुले l नरदेह प्राप्त झाले l 
    श्रीगुरुची पाऊले l हृदयी धरू ll
ओम नमो श्री व्यासोनारायणाय l
     ओम नमो श्री नित्यावताराय l
     ओम नमो श्री ज्ञानावताराय l
     ओम नमो श्री ब्रहमस्वरूपाय  l
        नित्याय , शुद्धाय , परम मंगलाय,
        श्री व्यासोनारायणाय नमो नमो ll

श्री गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री गुरूंना कोटि कोटि वंदन !

-प. पू. शंकरजी महाराज
मठाधिपती, जागृती आश्रम, शेलोडी.

Web Title: Holy festival of Shri Gurupujana on Ashadi Pournima!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.