विवाह करूनही हनुमंत ब्रह्मचारी कसे राहिले? वाचा ही पाराशर संहितेत दिलेली कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:02 PM2021-04-30T17:02:01+5:302021-04-30T17:02:18+5:30
भारतात चार-पाच ठिकाणी हनुमंत आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पहायला मिळते. त्यातले एक तेलंगणा येथे स्थित आहे.
विवाह लवकर व्हावा, म्हणून लग्नाळू मुले मुली हनुमंताची उपासना करतात हे माहित होते, परंतु ब्रह्मचारी अशी ओळख असणारा हनुमंत स्वत:देखील विवाहबद्ध झाला होता, हे फार कमी जणांना माहित असेल. परंतु, हा विवाह संसारसुखासाठी झाला नसून विद्यार्जनासाठी झाला होता. काय आहे त्यामागील सविस्तर कथा, जाणून घेऊया.
हनुमंत बालपणापासून सूर्याची उपासना करत होते. वैरागी वृत्तीच्या हनुमंतांना संसार करण्यात रस नव्हता. त्यांनी कायमस्वरूपी रामाचे दास्यत्व पत्करले होते. बलोपासनेबरोबरच त्यांचे सूर्यदेवांकडून ज्ञानार्जन सुरू होते. पुढील विद्या संपादन करण्यासाठी त्यांना ब्रह्मचर्य सोडावे लागणार होते. हनुमंताची गैरसोय पाहून सूर्यदेवांनी आपली कन्या सुवर्चला हिच्याशी हनुमंताला विवाह करायला सांगितला.
सुवर्चलादेखील तपस्विनी होती. तिलाही संसारसुखात रस नव्हता. दोघांची सम वृत्ती आणि ज्ञानार्जनाची ओढ पाहून सूर्यदेवांनी हा मध्य साधला आणि सर्व देवी देवतांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावून दिला. हा विवाह केवळ नाममात्र होता. विवाहित झाल्यावर हनुमंत पुनश्च ज्ञानसाधनेत तर सुवर्चला तप:साधनेत रंगून गेली. त्यामुळे दोहोंनी आपले ब्रह्मचर्य अबाधित ठेवले.
भारतात चार-पाच ठिकाणी हनुमंत आणि सुवर्चलेची एकत्र मूर्ती पहायला मिळते. त्यातले एक तेलंगणा येथे स्थित आहे. तर अन्य मंदिरे येल्लांडू, सिकंदराबाद, गुंटूर, राजमुण्ड्रि या ठिकाणी आहेत. अनेक दाम्पत्य सुखी संसारासाठी त्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतात.
तसे असले, तरीही आपल्या मनात ब्रह्मचारी हनुमंताची प्रतिमा ठासलेली आहे. त्याचा प्रभाव एवढा, की आजही हिंदू स्त्रिया हनुमंताला स्पर्शही करत नाहीत. दुरूनच नमस्कार करतात. तर अनेक युवा ब्रह्मचर्य पाळण्याबाबत हनुमंताचा आदर्श ठेवतात.