ज्योत्स्ना गाडगीळ
भगवंताने प्रत्येकाला आपले काम योजून दिले आहे. त्याच्या कृपेने ते कार्य सुरळीतपणे पार पडत आहे. त्याने कोणालाही काहीही उणे पडू दिले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष दिले आहे. आपल्याकडील ही विशेष बाब कोणती, हे काही जणांना उमगते, तर काही जणांना नाही. ज्यांना उमगते, त्यांना आपल्या अस्तित्वाचे मोल कळते आणि ज्यांना उमगत नाही, ते केवळ आपल्यापेक्षा दुसऱ्यांच्या वाट्याला किती छान गोष्टी आहेत, याची मोजदाद करत वेळ व्यर्थ वाया घालवतात. हा फरक आहे दृष्टीकोनाचा. काय आहे यावर विचार करायचा की काय नाही याची काळजी, हे समीकरण व्यक्तीपरत्वे बदलत जाते. याबाबत तुकाराम महाराज विठुरायाला सांगतात,
समचरण दृष्टि विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो।आणिक नलगे मायिक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा।ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी, तेथे चित्त झणी जडो देसी।तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत।
हेही वाचा : सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार!
हे विठुराया, आम्हालाही तुझ्यासारखी समतेची दृष्टी दे. तू ज्याप्रमाणे तुझ्या लेकरांकडे पाहताना भेदभाव करत नाहीस, तसे आम्हालाही वागता यावे, हीच प्रार्थना आहे. विषयांमध्ये अडकत गेलो, की मनातील द्वंद्व वाढत जाते, भेदभाव वाढतो आणि अद्वैताशी जोडले जाणे कठीण होऊन बसते. मोठ्या पदांची अभिलाषा करावी, तर जबाबदाऱ्यांचे काटेरी मुकुटही आनंदाने घालावे लागतात. त्यात आम्ही इतके अडकून जातो, की खरा आनंद कोणता हेदेखील विसरून जातो. आयुष्याचे मर्म कळेपर्यंत उशीर होतो आणि जे कमावण्यासाठी राबलो, ते नाशवंत होते याचा साक्षात्कार होतो. म्हणून आम्हाला तुझी दृष्टी हवी. समतेने, ममत्वतेने सर्वांकडे पाहणारी.
मनुष्यस्वभाव असा आहे, की तो बाह्य रुपाला महत्त्व देतो. व्यक्तीच्या कपड्यांवरून, राहणीमानावरून त्याची पारख केली जाते. मात्र, `ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा' हे मर्म आपण विसरून जातो. समोरच्याचे ज्ञान, स्वभाव, गुण यांची पारख न करता सत्ता, संपत्ती, श्रीमंतीला मान देतो. या स्वभावामुळेच समाजात केवळ आर्थिक नव्हे, तर मानसिक दरी देखील निर्माण होते.
याउलट वारीमध्ये सर्वधर्म, सर्वजाती, सर्व वर्गातील लोक वारकरी होऊन विठुरायाच्या भेटीला जातात. तेव्हा आपपरभाव राहतच नाही. जय हरी माऊली म्हणत, `एकमेका लागतील पायी रे' या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे सगळे एका प्रवाहात सहभागी होतात. मात्र, वारीतून बाहेर आल्यावर पुन्हा जर श्रेष्ठ कनिष्ठ भाव निर्माण होत असेल, तर काय उपयोग? यासाठी आपले जगणे ही रोजचीच वारी आहे असे समजून `जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' या उक्तीप्रमाणे एकमेका पायी लागावे आणि वारीचा आनंद लुटावा. हाच भावार्थ आणि हाच परमार्थ!
हेही वाचा : बोलताना जरा सांभाळून, शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते!