पौष पौर्णिमेला जुळून येताहेत अद्भूत दुर्मिळ योग; वाचा, महत्त्व आणि मान्यता
By देवेश फडके | Published: January 27, 2021 09:58 PM2021-01-27T21:58:39+5:302021-01-27T21:59:34+5:30
सन २०२१ मधील पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. पौष पौर्णिमेला जुळून येणाऱ्या अनेकविध अद्भूत दुर्मिळ व शुभ योगांविषयी जाणून घेऊया...
सन २०२१ मधील पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. कारण या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत असून, ते अद्भूत तसेच दुर्लभ असल्याचे सांगितले जात आहे. मराठी वर्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथींचे महत्त्व वेगळे आणि विशेष असते. पौष पौर्णिमेला जुळून येणाऱ्या अनेकविध अद्भूत दुर्मिळ व शुभ योगांविषयी जाणून घेऊया...
पौष पौर्णिमा : २८ जानेवारी २०२१
पौष पौर्णिमा प्रारंभ : २७ जानेवारी २०२१ रोजी उत्तररात्रौ ०१ वाजून १७ मिनिटे.
पौष पौर्णिमा समाप्ती : २८ जानेवारी २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून ४५ मिनिटे.
भारतीय पंचागानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे पौष पौर्णिमा २८ जानेवारी २०२१ रोजी साजरी करावी, असे सांगितले जात आहे.
गुरुपुष्यामृत योग
पौष पौर्णिमेला गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रात गुरुवार आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगाला गुरुपुष्यामृत योग म्हटले जाते. गुरुपुष्यामृत योग हा शुभफलदायी असल्याचे मानले गेले आहे. या योगावर केलेली सोने खरेदी किंवा गुंतवणूक भविष्यात उत्तम लाभदायक ठरू शकते, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी एखादे नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्राचे स्वामित्व शनीकडे असल्याचे सांगितले जाते. तसेच गुरुवारचे स्वामित्व बृहस्पतींकडे असते. तसेच आताच्या घडीला गुरु आणि शनी एकाच मकर राशीत असल्यामुळे पौष पौर्णिमेला जुळून येणारा गुरुपुष्यामृत योग अतिशय महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे.
समसप्तक योग
पौष पौर्णिमेला चंद्र आपलेच स्वामित्व असलेल्या कर्क राशीत विराजमान असेल. तसेच सूर्य मकर राशीत विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि चंद्र यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. समसप्तक योग म्हणजे सूर्य आणि चंद्र एकमेकांपासून सातव्या स्थानी असतील. सूर्य आणि चंद्र यांचा समसप्तक योग अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. पौष पौर्णिमेला सूर्याला अर्घ्य द्यावे. यावेळेस सूर्याचे पूजन, उपासना, आराधना करणे शुभ मानले जाते. जप, तप, दानधर्म आणि नवीन कार्य सुरू करणे उत्तम असल्याचे सांगितले जाते.
सर्वार्थ सिद्धी योग
पौष पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग नामक दुर्मिळ योग जुळून येत आहे. या योगावर अनेक शुभ कार्याचा शुभारंभ करणे उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. या कालावधीत पंचक, भद्रा आदी योगांचा परिणाम जाणवत नाही, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. सर्वार्थ सिद्धी योग कालावधीत केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते, असे मानले जाते.
प्रीती आणि रवी योग
पौष पौर्णिमेला प्रीती योग जुळून येत आहे. प्रीती योग कालावधीत धार्मिक कार्ये आणि नवीन कार्यांचा शुभारंभ उत्तम मानले गेले आहे. वाद मिटवणे, नवीन करार करणे, नातेसंबंध मजबूत करणे यांसाठी प्रीती योग शुभ मानला गेला आहे. तसेच या योगावर सुरू केलेल्या कार्यात यश मिळून मान-सन्मान वृद्धिंगत होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच पौष पौर्णिमेला रवी योग जुळून येत असून, या योगाच्या प्रभावामुळे जन्मकुंडलीतील १३ अशुभ योग दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शाकंभरी नवरात्रीची समाप्ती
शाकंभरी अर्थात फळ भाज्या देणारी देवी. एकेकाळी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तेव्हा सर्व सजीवांच्या रक्षणार्थ देवीने आपल्या शरीरातून फळ भाज्यांची निर्मिती केली होती. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी नवरात्र साजरी केली जाते. पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमा या कालावधीत शाकंभरी नवरात्र साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. शाकंभरी नवरात्राची सांगता पौष पौर्णिमेला होत असल्यामुळे देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना करणे शुभ मानले गेले आहे.