माणसांची पारख कशी करावी ते या चार बाहुल्यांकडून शिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:00 AM2021-09-15T08:00:00+5:302021-09-15T08:00:07+5:30
माणसांची पारख करताना आणि स्वत: माणूस म्हणून घडताना या बाहुल्यांची गोष्ट कायम लक्षात ठेवा.
एका उद्योगपतीने आपल्या मुलाला एकदा चार बाहुल्या दिल्या. ते पाहून मुलगा म्हणाला, 'बाबा, बाहुल्या तर मुलींना भेट दिल्या जातात, तुम्ही मला बाहुल्या का दिल्या आहेत?'
बाबा म्हणाले, `बेटा, कारण या साध्यासुध्या बाहुल्या नाहीत, तर यशस्वी आयुष्याचा मंत्र शिकवणाऱ्या या बाहुल्या आहेत. यांच्या कानाला छिद्र आहे. त्यातून हा दोरा आरपार घालून बघ. मग तुला मी यांचा मंत्र सांगतो.'
मुलाने कुतुहलाने एक एक करून बाहुलीच्या कानातून दोरा आरपार करायला सुरूवात केली. पहिल्या बाहुलीच्या एका कानातून दोरा घातला असता तो दुसऱ्या कानातून बाहेर आला. दुसऱ्या बाहुलीच्या एका कानात घातलेला दोरा तोंडातून बाहेर आला. तिसऱ्या बाहुलीच्या एका कानातून घातलेला दोरा तिच्या पोटात गेला.
ते पाहून बाबांनी मुलाला थांबवत म्हटले, `बेटा या केवळ बाहुल्या नाहीत, तर ही माणसांची वृत्ती आहे. ती ओळखायला मी तुला शिकवतोय. पहिल्या वृत्तीची माणसं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. दुसऱ्या वृत्तीची एका कानाने ऐकतात आणि तोंडाने दुसरीकडे सांगून मोकळे होतात. तिसऱ्या वृत्तीची माणसं कानाने ऐकून पोटात दडवून ठेवतात.'
मुलगा भुवया उंचावत म्हणाला, `मग बाबा, या तिघींपैकी कोणाची वृत्ती चांगली? कोणावर विश्वास ठेवावा?'
तेव्हा बाबांनी त्याला चौथी बाहुली दिली आणि तीनदा दोरा तिच्या कानातून आरपार घालायला सांगितला. त्यावेळेस दोरा एकदा कानातून, दुसऱ्यांदा ओठातून, तिसऱ्यांदा पोटातून बाहेर निघाला. ते पाहून बाबा म्हणाले, चौथ्या बाहुलीसारख्या वृत्तीचे लोक विश्वसनीय असतात. जे आवश्यक तिथे बोलतात, आवश्यक ते पोटात ठेवतात आणि आवश्यक तिथेच बोलतात. असे लोक जोडायला शिक आणि तू सुद्धा असाच बनलास, तरच विश्वसनीय ठरशील आणि भविष्यात मोठा उद्योगपती बनशील.
उद्योजकाने दिलेली शिकवण आपणही लक्षात घेण्यासारखी आहे. तेव्हा माणसांची पारख करताना आणि स्वत: माणूस म्हणून घडताना या बाहुल्यांची गोष्ट कायम लक्षात ठेवा.