आपण आपलं जीवनशिल्प सुरेख घडवूया आणि यशस्वी जीवन जगूया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:40 AM2020-07-07T04:40:33+5:302020-07-07T04:41:25+5:30
जीवनविद्या सांगते, स्वत: सुखाने जगून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणे, ज्ञान व सुसंस्कारांनी जीवन समृद्ध करणे, आपल्यातील सर्वप्रकारच्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य तो वापर करणे म्हणजे यशस्वी जीवन!
- प्रल्हाद वामनराव पै
मित्रांनो, आपण, मी स्वत:, जीवनतत्त्व, शिल्पकलेचे ज्ञान, उपकरणे, इच्छा, कल्पकता आणि प्रयत्न हे जीवनशिल्पाचे सात महत्त्वाचे घटक थोडक्यात जाणून घेतले. यातील कुठला घटक महत्त्वाचा बरं? अर्थात सगळेच महत्त्वाचे आहेत. आपल्या जीवनातील त्यांचं महत्त्व ओळखून, त्या सर्वांचा योग्य तो वापर करून, योग्य ती काळजी घेऊन आपण आपलं जीवनशिल्प सुरेख घडवूया आणि यशस्वी जीवन जगूया! यशस्वी जीवन म्हणजे काय? जीवनविद्या सांगते, स्वत: सुखाने जगून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणे, ज्ञान व सुसंस्कारांनी जीवन समृद्ध करणे, आपल्यातील सर्वप्रकारच्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य तो वापर करणे म्हणजे यशस्वी जीवन!
मुलांनो, आपण एकट्याने काहीच करू शकत नाही. साधा विचार यायलासुद्धा काहीतरी माध्यम लागतंच! म्हणजे स्वत:चे जीवनशिल्प घडवत असताना इतरांची मदत ही लागतेच आणि आपण स्वत: यशस्वी जीवन जगतो, तेव्हा त्याचे चांगले परिणाम स्वत:सहित कुटुंब, समाज पर्यायाने देशावरदेखील होत असतात. म्हणून मित्रांनो, आताच ध्येय ठरवा! इच्छा व्यापक करा! चला, स्वत:सोबत आपल्या देशाचाही विचार करूया. उद्याच्या समृद्ध भारतात माझंही योगदान असेल, हा विचार धरून त्यादृष्टीने ज्ञान संपादन करूया. कारण देशाचे, समाजाचे आपल्यावर असलेले अनंत ऋ ण आपल्याला फेडायचे आहेत.
आपलं यशस्वी जीवनशिल्प निश्चितच आकाराला येणार आहे, या सकारात्मक विचाराने वाटचाल करूया. ते आकाराला येण्यासाठी कारणीभूत असलेल्यांप्रतीही सदैव कृतज्ञ राहू! आई, वडील, शिक्षक, निसर्गातील अनेक गुरू, राष्ट्र आणि विश्व यांची कृतज्ञता आपण व्यक्त करू तेव्हाच खऱ्या अर्थाने ते आपलं यशस्वी जीवनशिल्प असेल! अशाप्रकारे सात घटकांच्या सहाय्याने आपलं यशस्वी जीवनशिल्प घडवायचं की नाही, हे ज्याचं त्यानं ठरवावं; कारण जीवनविद्या सांगते, ‘तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’