ज्योत्स्ना गाडगीळ
इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाली आणि आपण सगळेच आता नव्या दशकाशी जोडले गेलो आहोत. एकार्थाने एकवीशीत आलो आहोत. सद्यस्थितीतील आपले वय विसरून कालानुरूप आपणही नव्या दमाने, नव्या उत्साहाने येत्या काळाचे स्वागत करूया. यापुढेही आपल्या दैनंदिन जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग येतील, त्यांना सामोरे जाताना आपला मानसिक तोल ढळू नये, यासाठी मनाला आणि बुद्धीला थोडे सकस खाद्य पुरवणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांना शक्ती, भक्ती आणि युक्ती याचे मर्म समजवणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधाचे यथाशक्ती वाचन आणि चिंतन करूया. शीर्षकात आरंभ आणि प्रारंभ हे दोन्ही शब्द वापरण्याचे प्रयोजन असे, की आरंभ नवीन गोष्टींचा असतो आणि प्रारंभ खंडित झालेल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात असते. म्हणून आरंभ दासबोधाचा आणि प्रारंभ ईश सेवेचा!
ऊँ नमोजि गणनायका। सर्वसिद्धिफळदायका।अज्ञानभ्रांतिछेदका। बोधरूपा।।
समर्थ रामदास स्वामी हे जरी रामभक्त, हनुमान भक्त असले, तरी त्यांनीदेखील सर्व कार्यारंभी मान असलेल्या गणरायाला नमन करूनच दासबोधाची सुरुवात केली आहे. गणरायाला वंदन का? कारण तो सर्वसिद्धी देणारा आहे, अज्ञान दूर करणारा आहे, बोध देणारा आहे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणारा आहे.
हेही वाचा : उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?
कोणतेही काम सुरू करताना डोळ्यासमोर आदर्श हा असलाच पाहिजे. कोणासारखे तरी होण्याची धडपड आपल्या कार्याला गती देते, दिशा देते. गणनायक हा गणांचा अधिपती आहे. तो नायक झाला, कारण नेतृत्व करण्याचे गुण त्याच्या ठिकाणी आहेत. कार्यक्षम आहे. त्याच्या ठायी निर्णयक्षमता आहे. मनात कुठलेही द्वैत नाही. अशीच व्यक्ती इतरांना मार्गदर्शन करू शकते.
हे मार्गदर्शन साधेसुधे नाही, तर आपल्या देहाला, इंद्रियांना आणि मनाला असणार आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे. गणपती ही देवता ऊँकारस्वरूप असल्यामुळे विषयांचा विसर पाडून आत्मारामाशी आपली नाळ जोडण्यास मदत करणारी आहे.
कोणतेही ज्ञान पदरात पाडून घ्यायचे, तर विद्यार्थ्याच्या ठायी पराकोटीची नम्रता आणि शिकण्याची जिज्ञासा हवी. गणपती स्वत: बुद्धीची देवता असूनही त्याने विद्यार्थी होऊन वेद, शास्त्र, पुराण, कला यात नैपुण्य मिळवले. तो युद्धातही अजेय आहे. संगीतात पारंगत आहे. नृत्य-नाट्याचा रसिक आहे. चांगला खवैयासुद्धा आहे. थोडक्यात, जगण्याचा पुरेपूर आस्वाद घेणारी ही मंगलमूर्ती आहे.
अशा मंगलमूर्तीचे आशीर्वाद घेऊन समर्थ रामदास स्वामी आपल्याला अवगत झालेले ज्ञान, आपल्याला प्राप्त झालेला बोध आणि आपल्या हयातीत अनुभवलेले प्रसंग यांचे सार दासांना देण्यासाठी दासबोधाची रचना करतात. हे ज्ञानामृत पिऊन आपण बोध घ्यावा आणि आयुष्याला चांगले वळण द्यावे, हाच या ग्रंथाच्या निर्मितीचा हेतू. आपणही कणाकणाने हे ज्ञान दैनंदिन आयुष्यात घोळवुया आणि नरदेह सार्थकी लावूया.