नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 03:55 PM2021-01-07T15:55:31+5:302021-01-07T15:55:40+5:30

सुंदर शरीर, नूतन पत्नी, मेरूपर्वताएवढे धन, दिंगत किर्ती ह्या गोष्टी प्राप्त असूनही जर आपले मन प्रभुपदी नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही.

In this life doing something worth | नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक...

नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक...

googlenewsNext

जीवनात सांसारीक वासना वाढत गेल्या की, संसाराचा मोह सुटत नाही. प्रत्येक जण आपल्या शरीराची, कपड्यांची खूप काळजी घेतात. परंतु मृत्यूनंतरही जे आपल्या सोबत येते त्या मनाच्या काळजीकडे दूर्लक्ष करतात. मरणोत्तर जे सोबत येते त्याची किंमत करायला हवी. शरीर, धनाची चिंता करू नका. मरणानंतर लोक तुमच्या हातातील अंगठीही काढून घेतात. ह्या वास्तवाची जाणीव भारतीय संस्कृतीच्या सर्वधर्म ग्रंथातून... संत जणांच्या प्रबोधनातून व्यक्त करून देण्यात आली आहे. सदाचाराशिवाय मनाची शुध्दी नाही. दूर्लभ मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे? हे समजून घ्यायला हवे. नाहीतर -
‘देह जाईल जाईल । काळ यासी  बा खाईल।
ज्यादिवशी जन्म झाला। त्याचदिवशी मृत्यूचा दिनांक सुध्दा निश्चीत झाला आहे. आपण या जगात आलो. जग याचा अर्थच असा आहे की, ज-जन्मास येणे आणि ‘ग’ म्हणजे गमन करणे. सोडलेला श्वास पुन्हा घेता येणे म्हणजे जीवन असून, सोडलेला श्वास पुन्हा घेता न येणे म्हणजे मृत्यू आहे. म्हणूनच तुकोबासारखे संत सांगतात- मृत्यू सातत्याने प्रतिक्षा करीत असतो-‘अजुनी किती आहे अवकाश?
देह जै पासुनी झाला। तै पासुनी मृत्यू लागला।
जेवी सापें बेडुक धरीला। गिळू लागला लवनिमीषे।। (नाथ भागवत)
म्हणून जोपर्यंत ह्या देहात चैतन्य आत्मा आहे तो पर्यतच जीवनाचे सुवर्ण  करण्यासाठी परमार्थ विचाराची उपासना झाली पाहीजे. परमार्थ म्हणजे परम+अर्थ. परम=श्रेष्ठ आणि शरीरं सुरूपं नवीन कलंत्र, धनं मेरूतुल्यम्, यश श्चारू चित्रम।
हरेंरंघ्रिपदमें मनश्चेम लग्नं, तत: किम् तत: किम किंतत: किंम।।
सुंदर शरीर, नूतन पत्नी, मेरूपर्वताएवढे धन, दिंगत किर्ती ह्या गोष्टी प्राप्त असूनही जर आपले मन प्रभुपदी नसेल तर, त्याचा काहीच उपयोग नाही. कारण अंतकाळी ह्यापैकी कुणीही सोबत येत नाही. श्रीरामकृष्ण शिष्यांना नेहमी म्हणत की, संसार एक समुद्र आहे. जी विद्या भवसागर तरून जाण्यासाठी उपयुक्त आहे ती आध्यात्म विद्याच आहे. विचारवंत म्हणतात. ‘तुझा आणि माझा नाही भरवसा। गर्व कशाला रे भल्या माणसा।
मैनावती देवीने पुत्र गोपीचंद्राला, ध्रुवमातेने ध्रुवाला, मदालसेने पुत्राला या दृष्टीने जागृत केले. मदालसा मुलाला म्हणते -
‘या देहाचा भरवसा, पुत्रा न धरावा ऐसा
माझे माझे म्हणोनिया, बहू दु:खाचा वळसा
बहुत ठकविले, मृग जळीच्या आशा
तृष्णा सोडोनिया, योगी गेले रे वनवासा
स्मरे त्या हरीहरा, शरण जाई गोविंदा।’
प्रबोधनांचा हा विचार ध्यानी घेवूनच जीवनाची वाटचाल चालू द्यावी. जो श्वास घेतला तोच आपला। अधिकार नाही पुढच्यावरती।
दिले नियतीने श्वास मोजुनी । एकही न मिळे त्याच्यावरती।।’


- ह.भ.प. डाॅ.ज्ञानेश्वर मिरगे,
शेगाव.

Web Title: In this life doing something worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.