Mahabharat: भीमाचा विजय आणि दुर्योधनाचा दारुण पराजय का झाला? कृष्णाने सांगितले कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 03:39 PM2024-11-23T15:39:28+5:302024-11-23T15:40:08+5:30
Mahabharat: दर वेळी शक्ति प्रदर्शन करून युद्ध जिंकता येत नाही, तर युक्तिप्रदर्शनही करावे लागते, अशा वेळी कोणत्या चुका टाळायच्या ते कृष्णनीतीतून जाणून घेऊ!
दुर्योधन काय, की भीम काय दोघेही एकाच गुरुंचे शिष्य आणि एकापेक्षा एक बलवान. मात्र दुर्योधन त्याच्या आसुरी शक्तीमुळे भीमापेक्षा किंचीत अधिकच श्रेष्ठ होता. परंतु, युद्धात भीमाशी दोन हात करताना त्याच्या वाट्याला पराभव आला.
कणखर, शक्तीशाली, वज्रापेक्षा कठोर देहयष्टीच्या दुर्योधनाशी मुष्टियुद्ध करताना भीमाचे प्राण कंठाशी आले होते. तो सर्व शक्ती पणाला लावून दुर्योधनाला मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु उपयोग होईना. शेवटी भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करायला सांगितला. कारण, त्याच मांडीवर बसवण्यासाठी भर सभेत दुर्योधनाने द्रौपदीला खजिल केले होते. तो प्रसंग आठवून भीमाने जोरदार वार केला आणि दुर्योधन क्षणार्धात धारातिर्थी पडला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दुर्योधनाला अंतिम समयी काहीतरी बोलायचे होते. तो श्रीकृष्णाकडे अंगुलीनिर्देष करून त्याला जवळ बोलवत होता. श्रीकृष्णांनी जाऊन दुर्योधनाला सावरले. त्याने हात जोडून श्रीकृष्णाला आपल्या पराभवाचे कारण विचारले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी स्वत:च्या पापांची कबुली द्यायची सोडून दुर्योधन पापांचा हिशोब विचारत होता, हे पाहून श्रीकृष्णाला हसू आले. त्यांनी त्याला त्याच्या तीन चूका सांगितल्या.
पहिली चूक, युद्धापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे आले असता, त्यांना श्रीकृष्णाने दोन पर्याय दिले, `मी की माझे सैन्य?' दुर्योधनाने सैन्य मागून घेतले. अर्थात ऐहिक सुखाची निवड केली. याउलट श्रीकृष्णाला मागून घेतले असते, तर कदाचित यशाचे माप त्याच्या बाजूने झुकले असते.
दुसरी चूक म्हणजे, माता गांधारीने त्याला शिशूअवस्थेत पाहण्याचा मनोदय व्यक्त केला होता़ परंतु त्याने लज्जारक्षणार्थ पाला पाचोळा गुंडाळून मातेची भेट घेतली. त्याने तसे केले नसते, तर आईच्या दिव्यदृष्टीतून निघालेल्या शक्तीमुळे त्याचा देह कोणालाही दुभंगता आला नसता. मातेला दुर्योधनाला नग्नावस्थेत पाहणे, याचा गर्भितार्थ असा की आपल्या मातेशी, जन्मदात्रिशी कधीही आडपडदा न ठेवता आपल्या चुकांची, पापांची कबुली देणे आवश्यक असते. दुर्योधनाने तसे केले नाही.
तिसरी चूक म्हणजे, युद्धभूमीवर सर्वात शेवटी केलेले पदार्पण. युद्धाचा आढावा घेण्यासाठी नेत्याने सदैव पुढे असले पाहिजे, तरच बाकी सैन्याला मानसिक बळ मिळते. मात्र, दुर्योधनाने बाकीच्यांना पुढे पाठवून स्वत: शेवटी जाण्याची खेळी खेळली. त्यामुळे त्याला युद्धातले पेचप्रसंग जाणून घेता आले नाहीत आणि त्याच्या चुकांमुळे बाकीच्यांचा मृत्यू झाला.
या तिनही चूकांचे मूळ एका घोर पातकात दडले होते, ते म्हणजे मातेसमान असणाऱ्या कुलवधूचे अर्थात द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा कट! या पापातून त्याची सुटका नव्हती. त्याचे फळ मिळाले आणि शूरवीर योद्धा असूनही दुर्योधनाला अपयशाने प्राण गमवावे लागले.
श्रीकृष्णांचे बोल ऐकून दुर्योधनाच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. परंतु, खूप उशीर झाला होता. शेवटचा श्वास सोडताना त्याने श्रीकृष्णाला डोळे भरून पाहिले आणि हात जोडत जगाचा निरोप घेतला.