Makar Sankranti 2023: मकर संक्रातीला तिळगुळ वाटण्यामागे आणि पतंग उडवण्यामागे शास्त्राचे प्रयोजन काय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 05:32 PM2023-01-06T17:32:47+5:302023-01-06T17:33:22+5:30

Makar Sankranti 2023: हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सव निसर्गाशी, ऋतुचक्राशी सुसंगत आहे. मकर संक्रांतीची ओळख तिळगुळ आणि पतंग यांचेही महत्त्व जाणून घेऊ. 

Makar Sankranti 2023: What is the science behind giving sesame ladoo and flying kites on Makar Sankranti ? Find out! | Makar Sankranti 2023: मकर संक्रातीला तिळगुळ वाटण्यामागे आणि पतंग उडवण्यामागे शास्त्राचे प्रयोजन काय? जाणून घ्या!

Makar Sankranti 2023: मकर संक्रातीला तिळगुळ वाटण्यामागे आणि पतंग उडवण्यामागे शास्त्राचे प्रयोजन काय? जाणून घ्या!

googlenewsNext

संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. 

निसर्ग ऋतुनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत त्या रोगानुसार औषध वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा अवयव अन अवयव आखडून गेलेला असता़े  रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो. शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. शेतातून ताजे तीळ घरात आलेले असतात. त्यावेळी शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी याहून अधिक दुसरे योग्य औषध कोणते असू शकते?

तसेच मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे. सामान्यरित्या पतंग उडवण्यासाठी मोकळ्या मैदानात, एखाद्या इमारतीच्या छपरावर किंवा आगाशीत जावे लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसात सूर्यस्नान घडते.

यामागील आध्यात्मिक अर्थ उलगडून सांगताना पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, `तात्विक दृष्टीने पाहता, आपल्या जीवनाचा पतंगही या विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात आगाशीत उभी राहून उडवीत असते. संक्रांतीच्या दिवशी जसे आकाशात लाल, पिवळे, हिरवे रंगाचे पतंग उडताना दिसतात, तसे या विश्वाच्या विशाल आकाशात सत्ताधीश, श्रीमंत, विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग उडत असतात. पतंगाची हस्ती (अस्तित्व) व मस्ती तोपर्यंत राहते, जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हाती असते. सूत्रधाराच्या हातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डहाळीवर, वीजेच्या तारेवर किंवा संडासाच्या टाकीवर फाटलेला व विदृप दशेत पडलेला दिसतो. भगवंताच्या हातून सुटलेला मानव पतंगही थोड्याच दिवसात रंग उतरलेला, फिक्का व अस्वस्थ झालेला पाहायला मिळतो.'

या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तीळाचा स्नेह, गुळाचा गोडवा, पतंगाचा त्याच्या सूत्रधारावर विश्वास आपल्या जीवनात साकार झाला, तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले, असे म्हणता येईल.

Web Title: Makar Sankranti 2023: What is the science behind giving sesame ladoo and flying kites on Makar Sankranti ? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.