‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’; मानसिक वारीने होईल परमात्म्याचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 09:01 AM2020-07-01T09:01:07+5:302020-07-01T09:02:38+5:30

कोरोना या वैश्विक महामारीच्या कारणास्तव यावर्षी वारकरी पंढरपूरला जात नाही, गेले तरी पंढरपूर नगरीत प्रवेश नाही.

Make the mind happy with mental wari | ‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’; मानसिक वारीने होईल परमात्म्याचं दर्शन

‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’; मानसिक वारीने होईल परमात्म्याचं दर्शन

googlenewsNext

-डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

आषाढी वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. सांस्कृतिक व सामाजिक ठेवा वारीत पाहायला मिळतो. वारकरी संप्रदायातील संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज इत्यादी संतांनी सर्वसमावेशक असे धर्ममंदिर उभारले. विठ्ठलनामाची पताका जगभर पसरवली. कित्येक शतकांपासूनची परंपरा अव्याहतपणे चालू होती. परंतु यावर्षी मोजक्या वारकरी भाविकांसोबत संतांच्या पादुका पंढरपूरला गेल्या आहेत. कोरोना या वैश्विक महामारीच्या कारणास्तव यावर्षी वारकरी पंढरपूरला जात नाही, गेले तरी पंढरपूर नगरीत प्रवेश नाही.

वारकरी हा विठ्ठलाच्या भेटीसाठी उत्सुक असतो. परंतु यावर्षी तो आषाढीला पंढरपूरला जाणार नाही. याचे दु:ख विठ्ठलभक्तांना झाले. सर्वांच्या हितासाठी वारकरी घरीच बसून मनोमन वारीचा सोहळा अनुभवणार आहे. सामुदायिक भक्तीपासून वारकरी यावर्षी दुरावला असला तरी ‘‘मनोचेनि, मने हृदयी मज धरा। वाचेने उच्चारा । नाम माझे’’ या संत नामदेवांच्या अभंगाप्रमाणे यावर्षीचा सोहळा अनुभवयाचा आहे. अंतर्मुख होऊन हृदयात पांडुरंगाचे दर्शन करा. ‘‘काया ही पंढरी । आत्मा पांडुरंग’’ अशी मनात धारणा धरून पांडुरंगाची प्रचिती घ्या. आपल्या आत्मजाणिवा स्वच्छ करा. जगण्याचे व्यवस्थापन आपण वारीतूनच शिकलो. त्याचा यावर्षी प्रत्यक्ष अनुभव घ्या.
संतांकडे दूरदृष्टी असते. संतांनी सगळ्या सुख-दु:खावर मात केली आहे. ज्या डोळ्यांनी पांडुरंगाचे मुख पाहून आत्मानंदाची प्राप्ती होत होती. तेच सुख आत्म्याशी (पांडुरंगाशी) एकरूप होऊन मनाच्या गाभाऱ्यात पाहा. ध्यानावस्थेत जाऊन मनाशी संवाद साधा व आपले जीवन धन्य करून घ्या. नामस्मरणात काळ घालवा. ‘‘नामा म्हणे धन्य नामाचा प्रताप । ध्यानी एकरूप देवभक्त’’ ही अवस्था यावर्षी अनुभवयाची आहे. या वर्षीची वारकऱ्यांची वारी म्हणजे ‘‘आत्मव्त सर्वभुतेषू’’ हा विचार समोर ठेवून भारतीय संस्कृतीचा विचार जोपासायचा आहे. ‘‘सर्व हे आकार हरीचे शरीर।’’ या वचनाप्रमाणे घरीच बसून पांडुरंगाचे दर्शन घ्या. मन ताजेतवाने करा.
जगण्याची सद्वृत्ती व निसर्गाचे भान वारीतून येते साधारणत: बाराव्या शतकापासून वारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ‘चंद्रभागे स्नान विधि तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ’’ साधारणपणे वारकरी हा चंद्रभागेत स्नान करतो, श्री पुंडलिक व श्री पांडुरंगाचे दर्शन, नगर प्रदक्षिणा करून हरिकीर्तनात आपला दिवस घालवतो. पंढरपूरचा नित्यक्रत्य वारक-यांचा असतो. वारकरी पंथ हा आदिअंती भक्तिप्रधान आहे. परंतु तो वेदांचा सिद्धांत ‘एकमेवाद्वितीय ब्रह्म’ तोच वारकरी संतांचा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘हरि व्यापक सर्वमन । हा संत मुख्याचे वेदांत’ हरिव्यापक आहे. अव्दैत मन प्रतिपादन करूनही भक्तीचे तत्त्व प्रतिपादन करणारा वारकरी संप्रदाय आहे.
या वारकरी पंथाने जगण्याला एक नवे आयाम दिलेला आहे. वेळप्रसंगी कुठल्याही परिस्थितीत जगायला शिकविले. आतापर्यंत ज्या वा-या केल्या, संतांनी जी शिकवण दिली, तिचा अंगीकार करण्याची खरी गरज आहे. अशा या परिस्थितीत पांडुरंग परमात्म्याप्रति वारी मनांनी करायची आहे. ‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’ या वर्षी मनाने वारीत सामील व्हायचे आहे. मानसिक वारी केली तरी पांडुरंग परमात्मा भेटेल. संत मुक्तार्इंनीही मानसिक पूजेला महत्त्व दिले आहे. भावातीत होऊन प्रेमाने पंढरीनाथांना शरण जा मनाने चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन व नामस्मरण करा. श्री पांडुरंग परमात्म्याशी एकरूप व्हा.
मानसिक वारी म्हणजे मनाने केलेली वारी होय. त्या मनाला एका ठिकाणी स्थिर करा. स्थिर मन आनंदी होते. आणि आनंदी मन हेच ईश्वराचे खरे स्थान आहे. तो आनंद उपभोगण्यासाठी मानसिक वारी करा. मानसिक वारीने मनुष्य निर्मल होईल. आत्मविश्वास वाढेल. त्यातून त्याच्या जगण्याला स्थिरता प्राप्त होईल. स्थिर मनाने ज्ञानधारण केल्यास, त्या पांडुरंगाचे चिंतन केल्यास तो तुमच्याजवळच आहे. ‘एखभाव चिती । तरी न लगे काही भक्ती’ एक भाव जर चित्तामध्ये धारण केला तरी दुसºया कोणत्याही मुक्तीची गरज नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘आठवचि पुरे । सुख अवघे तोहरे ।। तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ।।’’
मनापासून हरिविषयीचे प्रेम असेल तरच ती भक्ती सिद्ध होऊ शकते. तीच भक्ती देवालापण आवडते. यावर्षी वारकरी वारीचा सोहळा अंतरात्म्यातून अनुभवेल. पंढरीचा देव पांडुरंग प्रकाशाचे एक ब्रह्म चिन्ह समजून अंतरात्म्यात ज्योतीत पांडुरंग परमात्म्याची ज्योत असून, या ज्योतीवरच ईश्वराची अनुभूती वारकरी घेईल. चित्तामध्ये भक्तिरसाचा सोहळा अनुभवयाला मिळेल. मन भक्तीत न्हाऊन निघेल. निर्गुण परमात्म्याची भेट होईल.

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: Make the mind happy with mental wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.