मंगळाच्या पत्रिकेवर ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे केले असता वैवाहिक जीवन मंगलमय होते!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:49 PM2022-02-02T16:49:48+5:302022-02-02T16:50:10+5:30
यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, परंतु शास्त्राने प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला आहे, हे लक्षात घेतले तर आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर नक्कीच दुणावेल!
मंगळाची पत्रिका हा पत्रिका दोष नसून ती एक ग्रहस्थिती आहे. त्याचा परिणाम स्वभावावर होतो. मंगळ प्रत्येकाच्या कुंडलीत असतो, परंतु त्याचे स्थान मंगळ कडक आहे की सौम्य किंवा गौण आहे हे ठरवते. वधू वर दोघांना कडक मंगळ असेल तर ते दोघेही तापट स्वभावाचे असू शकतात. त्यांच्या संसारात पदोपदी वादाला तोंड फुटू शकते. याकरिताच पत्रिका पाहताना मंगळ स्थान पाहिले जाते.
अनेकदा पत्रिकेतील मंगळ हा दोन्ही पत्रिकेत अनुकूल नसल्यामुळे बाकी गोष्टी जुळूनही मंगळ दोष सांगून लग्न ठरत नाही. काही जण तर मंगळ आहे कळताच नकार कळवून टाकतात. हे अज्ञान दूर करून आपण मंगळाच्या स्थितीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. तसेच ज्योतिष शास्त्राने दिलेल्या पर्यायांचादेखील वापर केला पाहिजे.
कडक मंगळ असलेल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह सौम्य मंगळ असलेल्या व्यक्तीशी लावला जातो. त्यामुळे मंगळाचा प्रभाव सौम्य होतो. संसाराचे संतुलन होते आणि लग्न यशस्वी होते. परंतु दोन्ही पत्रिका जेव्हा मंगळाच्या येतात तेव्हा पुढील उपाय करावे लागतात. जेणेकरून वधू किंवा वराच्या पत्रिकेत द्विभार्या, घटस्फोट, वैधव्य, विधुर योग टाळता येतात. ते उपाय कोणते हे जाणून घेऊ.
कुंभ विवाह :
हा एक प्रकारचा काल्पनिक विवाह आहे. यामध्ये नियोजित वर किंवा वधूचा विवाह कुंभ अर्थात घड्याशी लावला जातो. वैवाहिक विधी पूर्ण झाल्यावर तो कुंभ मोडला जातो. असे केल्याने मंगळ दोष समाप्त होतो असे मानले जाते.
भात पूजा :
उज्जैनमधील मंगलनाथ नावाच्या ठिकाणी भात पूजा केली जाते. भारतातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे हे मांगलिक दोषासाठी सदर पूजा केली जाते. या ठिकाणी तांदळाची पूजा केल्याने मांगलिक दोष दूर होतो असे मानले जाते.
कडुलिंबाचे झाड लावा:
तुम्ही राहत असलेल्या आवारात कडुलिंबाचे रोप लावा असे ज्योतिष शास्त्र सांगते. त्या रोपाचे झाड होईपर्यंत त्याची काळजी घ्या. असे केल्याने मांगलिक दोष दूर होतो असे म्हणतात.
वरील तिन्ही गोष्टी कोणाला अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वाटतील तर कोणाला फोल वाटतील. वास्तविक यातून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृतीतील लवचिकता. कोणत्याही गोष्टीसाठी अडून न राहता संकटातून मार्ग काढणे आणि नरबळी, पशुबळी अशा अंधश्रद्धेला दुजोरा न देता प्रतीकात्मक गोष्टीतून पर्याय शोधणे, ही सकारात्मक बाजू लक्षात घेण्यासारखी आहे. यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, परंतु शास्त्राने प्रत्येक गोष्टीचा किती सखोल विचार केला आहे, हे लक्षात घेतले तर आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर नक्कीच दुणावेल!